Sunetra Pawar: वारकऱ्यांचे स्वागत परंपरेला साजेसे करा! पालखी सोहळ्याबाबत सुनेत्रा पवारांचे कडक आदेश
Sunetra Pawar: आषाढी पालखी सोहळा नियोजनासाठी विभागीय कार्यालयात उच्चस्तरीय बैठक; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत विविध विभागांचा आढावा.

Sunetra Pawar – संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची मोठी परंपरा असून त्यांचे स्वागत आजच्या परंपरेला साजेसे करावे, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. आषाढी पालखी सोहळा नियोजनासाठी विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, विभागीय आयुक्त शितल तेली – उगले, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम,
पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्यांशी संबंधित प्रमुख विश्वस्त, पालखी प्रमुख, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री म्हणाल्या, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू आहे.
दरवर्षी लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. यामुळे प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पावसाळ्याच्या कालावधीत वारी होत असल्याने पालखी मार्गावरील रस्ते, मुक्कामस्थळे आणि विसावा स्थळांवर चिखल होणार नाही, याची सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच संबंधित यंत्रणांनी दक्षता घेऊन दुरुस्ती, मजबुतीकरणाची कामे हाती घ्यावी.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मार्गावरील अपूर्ण कामे पूर्ण करावीत. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालये, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्रे आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी. निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवून शौचालयांची नियमित स्वच्छता करावी. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही त्या म्हणाल्या.






