Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध; अब्दुल शेख यांच्याकडून सपकाळांच्या राजीनाम्याची मागणी
काँग्रेस नेत्यांकडून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

Sunetra Pawar : काँग्रेस नेत्यांकडून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. नेवासे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुल शेख यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु कोणत्याही महिला नेत्याबाबत अपमानास्पद, अवमानकारक किंवा अशोभनीय भाषा वापरणे हे राज्याच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळिमा फासणारे आहे, असे मत अब्दुल शेख यांनी व्यक्त केले.
वैयक्तिक पातळीवरील टीका आणि महिलांचा अपमान अमान्य
पत्रकारांशी बोलताना अब्दुल शेख म्हणाले, “राजकारणातील टीका-टिप्पणी, धोरणे आणि भूमिका या केवळ विचारांपुरत्याच मर्यादित राहिल्या पाहिजेत. वैयक्तिक पातळीवर जाऊन महिलांचा (Sunetra Pawar) अवमान करणारी भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाऊ शकत नाही.
अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे केवळ एका व्यक्तीचाच नव्हे, तर संपूर्ण महिला वर्गाचा अपमान होतो. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आणि विशेषतः महिलांचा सन्मान राखणे ही सर्वच राजकीय पक्षांची नैतिक जबाबदारी आहे.”
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी
या प्रकरणाची गंभीर दखल काँग्रेसच्या हायकमांडने तात्काळ घ्यावी. अब्दुल शेख म्हणाले की, “काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा. अशा विकृत वक्तव्यांना पक्षाचे पाठबळ नाही, असा स्पष्ट संदेश जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.”
तीव्र आंदोलनाचा सज्जड इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या सन्मानाबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोणतीही तडजोड करणार नाही, असा पुनरुच्चार करत शेख यांनी स्पष्ट केले की, “सुनेत्रा वहिनींचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही.
जर संबंधित नेत्यावर योग्य कारवाई झाली नाही, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यभरात लोकशाही व संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, तसेच अशा वक्तव्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.”
राजकीय संस्कृती टिकवण्याचे आवाहन
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही नेहमीच सुसंवाद, परस्पर आदर आणि सभ्यतेवर आधारित राहिली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी वक्तव्ये करताना संयम बाळगावा, महिलांचा सन्मान राखावा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सभ्यता टिकवून ठेवावी, असे आवाहन शेवटी अब्दुल शेख यांनी केले.






