Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ती तातडीने भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री पदासह अजित पवारांकडे असलेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कोणाकडे द्यायच्या, यावर पक्षांतर्गत चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नावाचे स्पष्ट संकेत दिले असून, उपमुख्यमंत्री पदाची जागा तातडीने भरली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. पक्ष आणि सरकारचे काम थांबून चालणार नाही, असं मत व्यक्त करत भुजबळ यांनी “शो मस्ट गो ऑन” या उक्तीचा उल्लेख केला आहे. काय म्हणाले छगन भुजबळ? अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण पक्ष हादरून गेला असला, तरी शासनाची घडी विस्कटू नये, यासाठी त्वरित निर्णय आवश्यक असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवावी, असे अनेक आमदारांचे मत असून ते योग्यच वाटते, असंही त्यांनी स्पष्ट केले. उद्या आमदारांची महत्त्वाची बैठक शनिवार, 31 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत विधीमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे. या बैठकीत जर सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत झाले, तर त्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याआधी नेत्यांनी बारामती येथे जाऊन सुनेत्रा पवार यांच्याशीही चर्चा केली. प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये, यासाठी महत्त्वाच्या खात्यांचे वाटप लवकर करण्यावर भर दिला जात आहे. पक्षांतर्गत नव्या रचनेची शक्यता सूत्रांच्या माहितीनुसार, केवळ उपमुख्यमंत्री पदापुरतेच नव्हे तर पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरही बदल होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचे समजते. chagan bhujabal अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र अजूनही शोकसागरात असतानाच, प्रशासन आणि राजकीय स्थैर्य राखण्यासाठी हे निर्णय घेतले जात आहेत. आता सर्वांचे लक्ष शनिवारी होणाऱ्या आमदारांच्या बैठकीकडे लागले असून, त्यातून राज्याला नवे उपमुख्यमंत्री मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.