Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या पदाचा औपचारिक पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर काही तासांतच सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री कार्यालयात दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होती. विशेष म्हणजे, काही वेळातच शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील हे देखील त्याच दालनात दाखल झाले. या सर्वांमध्ये सुमारे १५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच ही भेट झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या चर्चेमध्ये नेमके कोणते मुद्दे मांडले गेले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी या भेटीला विशेष राजकीय महत्त्व दिले जात आहे. दरम्यान, ही बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीकडे रवाना झाल्या असून त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या घडामोडींमुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात कोणते मोठे निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.