Sunetra Pawar : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची बिनविरोध निवड झाली. प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री नीलकंठेश्वर पॅनलचे वर्चस्व राहिले होते. त्यांच्या निधनानंतर अध्यक्षपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष होते. संचालक मंडळाने सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली होती. १२ मार्च रोजी झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. इतर कोणताही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर संचालक मंडळ व मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, संचालक योगेश जगताप,नितीन सातव,स्वप्निल जगताप,विजय तावरे,कार्यकारी संचालक अशोक पाटील,सर्व संचालक मंडळ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुनेत्रा पवार म्हणाल्या, “सभासद, संचालक व कामगारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. अजितदादांनी कारखान्याला दिलेले बळ कायम ठेवत सर्वांना सोबत घेऊन कारखान्याची प्रगती साधण्याचा प्रयत्न करणार आहे. सभासदांना सर्वाधिक ऊसदर देऊन कारखाना राज्यात नंबर वन करण्याचा ध्यास घेईन.” विशेष म्हणजे, अध्यक्षपदी सुनेत्रा पवार आणि उपाध्यक्षपदी संगीता कोकरे कार्यरत असल्याने माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राज्यातील एकमेव कारखाना ठरला आहे, जिथे अध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्ही पदांवर महिला आहेत.