Morgaon : सुनेत्रा पवार यांची शेतकरी कुटुंबासोबत भाऊबीज
Morgaon : सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील मुर्टी गावामध्ये दीपावली निमित्ताने भेट दिली जोगवाडी, आंबेी गावामध्ये दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी केली .

मोरगांव : दुष्काळाच्या संकटात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले असून, आगामी काळात चारा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील मुर्टी गावामध्ये दीपावली निमित्ताने भेट दिली जोगवाडी, आंबेी गावामध्ये दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी शेतकरी महिलांसोबत जेवणाचा आस्वादही घेतला. तसेच मुर्टी ,जोगवडी, आंबेीआदी गावातील परिसरामध्ये दुष्काळी परिस्थितीचे पाहणी केली.
शासनाकडून मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडे विचारणा केली. यावेळी काही शेतकऱ्यांनी अग्रीम मदत, कर्जमाफी आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळाल्याचे सांगितले. या मदतीमुळे दुष्काळी परिस्थितीत आधार मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सुपे-सात गाव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करून परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही पवार यांनी सांगितले.
बारामतीच्या विकासासाठी अजितदादांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे. पाणी आणि मूलभूत सुविधांसह ग्रामीण भागातील प्रश्न नियोजनबद्ध पद्धतीने सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.ग्रामीण भागातील स्केटिंगपटू शिवम नलावडे याने इंडोनेशिया आणि देहराडून येथील स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल सुनेत्रा पवार यांनी त्याचे कौतुक करून गौरव केला. ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सोनकरवस्तीवरील भेटीनंतर त्यांनी जोगवाडी येथे शिवाराची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. पुरंदर उपसा सिंचनचे पाणी लवकरच या भागात पोहोचेल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर अंबी येथे शेतकरी कुटुंबाची भेट घेतली. अंबी फाट्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असता, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्नील रावडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी कदम ढोले, पंचायत समिती सदस्य रावसाहेब चोरमले, लालासो नलवडे, बाळासो जगदाळे, किरण जगदाळे, संतोष शिंदे, सदाशिव सोनवलकर विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
मुर्टी परिसरातील वनविभागाच्या हद्दीत सुमारे २०० मोकाट जनावरे असून, त्यांच्यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली. शासनाकडून चारा पिके आणि ज्वारीचे बियाणे उपलब्ध झाल्याने आता लागवड करता येईल; मात्र मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे या जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.





