Heatstroke – राज्यातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात राज्यातील उष्माघाताचा पहिला बळी गेल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. येथील एका 25 वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. यामुळे उन्हाच्या झळा आता माणसांच्या जिवावर उठत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. सोयगाव तालुक्यात काल 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. परिणामी, अमोल दामोदर बावस्कर नामक एका 25 वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. तालुक्यातील निमखेडी बस थांब्यावरील ही घटना घडली. हा तरुण उन्हात बस थांब्यात विसावा घेत होता. तेव्हा तो अचानक कोसळला. या प्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने जनतेला उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जळगावमध्ये पारा 40 अंशावर ! जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंशावर पोहोचला आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र उकाडा वाढला आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक मठ्ठा तसेच शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी करत आहेत. जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपासून उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे नागरीक घराबाहेर पडणे टाळत आहेत. आगामी काळात जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.