Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का ! सुलभा खोडके यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर निवडणूक आल्याने राज्यातील घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. यादरम्यान काही नेते तिकीट मिळण्याच्या आशेने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अमरावती शहरातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी आज पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
सुलभा खोडके यांच्यासोबत ‘या’ नेत्यांनी केला प्रवेश
आमदार सुलभा खोडके यांच्यासमवेत अमरावतीचे माजी महापौर शेख जफर शेखजब्बार, सरचिटणीस अॅड. शोएब खान, बडनेराचे नगरसेवक अयुब भाई, सचिव आसिफभाई अशरफ अली, समाजसेवक हाजी रफिक, अॅड. शब्बीर भाई, अ-रज्ज्जाक उर्फ रज्जु चचा, जोएब भाई बरहानपुरवाली, आणि मुस्तफा भाई बुरहानी यांनी देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसने केली होती हकालपट्टी
विधान परिषद निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून काँग्रेस पक्षाने सुलभा खोडके यांची हकालपट्टी केली. सुलभा खोडके यांनी पक्षासमोर खुलासा करूनही पक्षाने त्यांचे ऐकले नाही. सरतेशेवटी काँग्रेसमध्ये राहून आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात येताच सुलभा खोडके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांनी त्याला पक्षाचा एबी फॉर्मही दिला आहे.





