नवी दिल्ली – दिल्लीतील वसंत कुंज परिसरात बुरारीसारख्या सामूहिक आत्महत्येचे प्रकरण समोर आले आहे. एका पित्याने आपल्या चार अपंग मुलींसह सल्फास नावाचे विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. मुली एकाच बेडवर एका खोलीत मृतावस्थेत तर वडील हिरालाल दुसऱ्या खोलीत बेडवर मृतावस्थेत आढळले. वर्षभरापूर्वी त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलींच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे तो वेळेवर नोकरीला जाऊ शकला नाही. त्याला सहा महिन्यांपूर्वी नोकरीवरून काढून टाकले होते. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आपल्या मुलींची काळजी घेण्यासोबतच त्याला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत होता. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. हिरालाल यांनी सामूहिक आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी जितिया पूजाही केली होती. वसंतकुंज दक्षिण पोलिस स्टेशन वैद्यकीय मंडळामार्फत पाच मृतदेहांचे शवविच्छेदन करत आहे. घटना शुक्रवारी सकाळी १०.१८ वाजता शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर उघडकीस आली