इस्लामाबाद, कराची – पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात आज एका स्कूलबसवर झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यामध्ये किमान ५ जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये ३ शाळकरी मुलांचाही समावेश आहे. बलुचिस्तान प्रांतातल्या कुंदुझ जिल्ह्यामध्ये स्कूलबस शाळेच्या मुलांना घेऊन जात असताना आत्मघातकी हल्लेखोराने स्फोट घडवून या बसला उडवून दिले, असे लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. हा आत्मघातकी हल्ला भ्याड आणि भयानक असून या हल्ल्यात तीन मुले आणि दोन प्रौढांचा मृत्यू झाला आहे आणि इतर अनेक मुले जखमी झाली आहेत, असे लष्कराने म्हटले आहे. हा आत्मघातकी बॉम्बस्फोट एखाद्या वाहनावर लावलेल्या आयइडीद्वारे घडवून आणण्यात आला होता, असे पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने एक्सवर पोस्ट केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. झिरो पॉइंट परिसराजवळ झालेल्या या स्फोटात ३८ जण जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटानंतर कायदा अंमलबजावणी संस्थांचे कर्मचारी तपासासाठी पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत, असे खुजदारचे उपायुक्त यासिर म्हणाले. प्राथमिक निष्कर्षांवरून हा हल्ला आत्मघातकी स्फोट असल्याचे दिसून आले आहे. ठार झालेल्यांचे मृतदेह आणि जखमींना कंबाईन्ड मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पोचवण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्यांना तेथून क्वेट्टा आणि कराचीला हलवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. या बॉम्बस्फोटात ४ मुले ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि निष्पाप मुले आणि त्यांच्या शिक्षकांच्या हत्येबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या हल्ल्यामागील दोषींना ओळखून शिक्षा करण्याचे आदेश त्यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहेत. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमांना लागून असलेल्या बलुचिस्तान प्रांतात बलुच फुटीरवाद्यांकडून घातपाती कारवाया केल्या जात असतात. विशेषतः चायना-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरवर बलुच बंडखोरांकडून हल्ले केले जात असतात.