Pakistan – पाकिस्तानमधील पेशावरमध्ये निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर आज दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये किमान ३ सुरक्षा रक्षक ठार झाले आणि अन्य दोघे जखमी झाले आहेत. या हल्ल्यावेळी ३ दहशतवादी देखील ठार झाले आहेत. पेशावरमधील फ्रॉन्टियर कॉर्प्सच्या मुख्यालयावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यामध्ये ३ दहशतवादी देखील मारले गेले आहेत. एका दहशतवाद्याने मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आत्मघातकी स्फोट घडवून आणला. त्यानंतर दहशतवाद्यांनी इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये हे दोन दहशतवादी देखील मारले गेले. सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला असून या परिसराची कसून तपासणी केली जात आहे, असे माध्यमांनी म्हटले आहे. या निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर हल्ला झाला असून परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे, असे पेशावरच्या राजधानी शहराचे पोलीस अधिकारी मियान सईद अहमद यांनी देखील म्हटले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकांना पेशावरमधील लेडी रिडींग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. फ्रॉन्टियर कॉन्स्टॅब्युलरी असे मूळ नाव असलेल्या या निमलष्करी दलाचे नाव जुलै महिन्यात सरकारने बदलून फ्रॉन्टियर कॉर्प्स असे करण्यात आले आहे. या सुरक्षा दलाचे मुख्यालय अत्यंत दाटीवाटीच्या परिसरात आणि लष्करी छावणी क्षेत्रापासून अगदी जवळच आहे.