Pune District : कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना सभासदत्व नाही
Pune District : कारखान्याच्या उपविधीनुसार कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्तीने सभासदत्वासाठी अर्ज केल्यानंतर तो विहित मुदतीत स्वीकारणे किंवा अपात्रतेचे कारण नमूद करून अर्ज नाकारणे आवश्यक आहे.

मंचर : सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना सभासद करून घेता येणार नसल्याचे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर ऊस उत्पादन करणार्या शेतकर्यांना कारखान्याचे सभासदत्व देण्यावर मर्यादा आल्या आहेत.
साखर आयुक्तालयाने 21 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 मधील कलम 22चा संदर्भ देत सहकारी साखर कारखान्याचे सभासद संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणे बंधनकारक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे कार्यक्षेत्राबाहेरील ऊस पुरवठादारांना कारखान्याचे सभासद करून घेता येणार नसल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
कारखान्याच्या उपविधीनुसार कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्तीने सभासदत्वासाठी अर्ज केल्यानंतर तो विहित मुदतीत स्वीकारणे किंवा अपात्रतेचे कारण नमूद करून अर्ज नाकारणे आवश्यक आहे. अर्ज नाकारल्यास संबंधित व्यक्तीस प्रादेशिक सहसंचालकांकडे अपील करता येणार आहे. तसेच सभासदत्वाचे अर्ज आणि शेअर अनामत रक्कम निर्णयाविना प्रलंबित असल्यास ते अर्ज निकाली काढून, नाकारलेल्या अर्जांची शेअर अनामत रक्कम संबंधितांना परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यापुढे कारखान्याच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती, संबंधित गावांतील पात्रता आणि उपविधीतील तरतुदी यांचा विचार करूनच सभासदत्वाची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्राबाहेरील शेतकर्यांना ऊस पुरवठा करता येऊ शकतो; मात्र केवळ ऊस पुरवठ्याच्या आधारावर कारखान्याचे सभासदत्व मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
भीमाशंकर कारखान्याच्या प्रस्तावाला खिळ
साखर आयुक्तांच्या परिपत्रकानुसार कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना सभासद करून घेता येणार नाही. त्यामुळे भीमाशंकर कारखान्याने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकर्यांना सभासद करून घेण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावाला साखर आयुक्तांच्या निर्णयामुळे खिळ बसली आहे.





