पुणे जिल्हा | उजनी काठावर ऊस लागवडीला सुरुवात

पळसदेव, (वार्ताहर) – यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उजनी पट्ट्यात समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराज्या शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. सध्या उजनी धरणात अद्याप समाधानकारक पाणी साठा उपलब्ध नसला तरी शेतकरी डेअरिंग करून उसाची लागवडीस सुरुवात केली आहे. सध्या उजनी पट्ट्यातील पळसदेव भागात उसाच्या लागवडीला वेग आला आहे.
अनेक ठिकाणी उसाची लागवडीस सुरुवात झाली आहे; मात्र या वर्षीदेखील बियाणे महाग झालं आहे. उसाचं एकरी बियाणे सहा ते सात हजार रुपये असल्याने यंदाची उसाची लागवड महाग झाली आहे. शिवाय उसाची लागवड करण्यासाठी देखील एकरी 6 हजार रुपयाचा दर असल्याने यंदा शेतकर्यांना महागाईचा चांगलाच फटका बसणार आहे. सध्या उसाची लागवड करताना शेतकरी को 86032 या उसाला अधिक पसंती देत आहे.
या बाबत शेतकरी रमेश पवार, अंबादास घाडगे या शेतकर्यांनी सरंगितले की, उसाची लागवडीपर्यंत नांगरट तीन ते साडेतीन हजार, कलटी अठराशे, सरी सोडणे दोन ते अडीच हजार खताचा एकरी 2 ते तीन हजार व बियाणे सहा ते सात हजार असा मिळून किमान एकरी किमान वीस ते तीस हजार रुपयांचा खर्च येत आहे.
त्यामुळे आताच दुष्काळाच्या झळा सोसून आलेल्या बळीराजाला नव्याने पिकाची लागवड करताना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यात सध्या शेत मजुराची टंचाई असल्याने बळीराजाला शेतीची कामं करण्यासाठी अधिकच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.




