Indapur : उजनीच्या पाण्यावरून इंदापूरमध्ये संघर्षाची ठिणगी
Indapur : बावडा ग्रामपंचायतीनेही गावातील पाणीपुरवठ्याची अडचण मांडत भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीने भीमा नदीपात्रातील पाण्याची कमतरता आणि वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या अडचणींकडे लक्ष वेधले आहे.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे चित्र समोर आले असून, उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात तातडीने पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बावडा, पिंपरी बुद्रुक आणि भांडगाव येथील ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे इंदापूर विधानसभा अध्यक्ष अभिजित घोगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
पाण्याचा प्रश्न केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नसून,नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि पशुधनाच्या अस्तित्वाशी जोडला गेला आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन भीमा नदीत विसर्ग करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
अभिजित घोगरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, नदी कोरडी पडल्याने काही गावांतील नळपाणीपुरवठा योजनांवर परिणाम होत आहे. नागरिकांना नियमित पाणी मिळण्यात अडचणी येत असून, जनावरांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बावडा ग्रामपंचायतीनेही गावातील पाणीपुरवठ्याची अडचण मांडत भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीने भीमा नदीपात्रातील पाण्याची कमतरता आणि वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या अडचणींकडे लक्ष वेधले आहे. भांडगाव ग्रामपंचायतीनेही गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी नदीत पाणी सोडण्याची विनंती केली आहे. १५ ऑक्टोबरच्या नियमाचा मुद्दा, विसर्गाच्या वेळेवरून मागणी करण्यात येत आहे.
निवेदनामध्ये १५ ऑक्टोबरनंतरच्या धरण व्यवस्थापनाच्या नियमांचा आणि पाण्याच्या नियोजनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. पावसामुळे धरणाच्या दारांवर आणि नदीपात्रात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याची गरज असल्याचे घोगरे यांनी म्हटले आहे. तसेच पाणी नंतर सोडण्यापेक्षा सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तातडीने विसर्ग करण्याची मागणी त्यांनी केली आहे. निवेदनात पुढील २४ ते ४८ तासांत उजनीतून भीमा नदीत विसर्ग सुरू करावा, लाभक्षेत्रातील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरावेत आणि पाणी सोडण्याच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायतींची एकमुखी मागणी
बावडा, पिंपरी बुद्रुक आणि भांडगाव या गावांकडून आलेल्या निवेदनांमुळे स्थानिक पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी पाणी आणि गावांतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याबाबत संबंधित विभागाने परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





