pune district : आधुनिक प्रयोगशीलतेचा अवलंब करून ऊस शेती फुलवली

शिरूर : सविंदणे (ता.शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नवी दिल्लीचे सदस्य बाळासाहेब पडवळ यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक प्रयोगशीलतेचा अवलंब करून ऊस शेती फुलवली आहे. गेल्या २५ वर्षांपासून ऊस शेतीत रमलेले पडवळ हे दरवर्षी चार ते पाच एकर ऊसाचे पीक घेतात.त्यांना यातून प्रति एकरी सरासरी ८५-९० टन उसाचे उत्पादन मिळत असून प्रति एकरी तीन लाखाहून अधिक उत्पन्न मिळते आहे.
नवनवीन ऊसाच्या वाणांची निवड करत व लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून पडवळ हे दरवर्षी ऊसाची हिरवीगार शेती फुलवतात. त्यांनी सध्या त्यांच्या शेतात पी.डी.एन १५०१२ या नवीन ऊस वाणाची लागवड केली असून अधिक उत्पादनक्षम आणि प्रतिकूल परिस्थितीत टिकणारे वाण म्हणून या उसाच्या वाणाची ओळख आहे. साखरेचे अधिक प्रमाण,रसवंतीस योग्य, तसेच सुरू,पूर्व, हंगामी व आडसाली हंगामासाठी ही जात योग्य आहे. तसेच, २००५ पासून त्यांनी को ८६०३२, को.सी ६७१, ९४०१२, ९८०५, ४३४, २६५, व्ही एस आय ३१०२, ८००५, १८१२१, पाडेगाव १०००१ या वाणांचे बेणे प्लाट तयार करून स्थानिक शेतकऱ्यांना पुरवले आहे. याशिवाय उत्तरप्रदेशात ही ऊसाचे बेणे पाठवून त्यांनी ऊस उत्पादनाचा प्रसार केला आहे.
ऊस शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, फलटण, सातारा, भिमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव आणि कृषी विभागातील तज्ज्ञांकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच जवळपास ५३ साखर कारखाने व संस्थांना त्यांनी आतापर्यंत भेटी दिल्या आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने २०१४ मध्ये कृषी अभ्यास दौऱ्यासाठी त्यांची निवड केली होती. याशिवाय विविध पीक स्पर्धा पुरस्कार, भिमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि सामाजिक संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
ऊस लागवडीसाठी ‘या’ पद्धतीचा केला अवलंब
• ऊस लागवड करण्याअगोदर मातीची सुपीकता तपासण्यासाठी माती परीक्षण केले.
• तागासारखे हिरवळीचे पीक घेऊन जमिनीत गाडले. पीक बदल म्हणून सोयाबीन घेतले
• जमिनीची खोल नांगरणी करून मशागत करून जमीन भुसभुशीत केली
• साडेचार फूट सरी काढून पट्टा पध्दतीने एक फुट अंतरावर एक डोळा पद्धतीत लागवड केली.
• बियाणे लागवड करताना कीड वगैरे लागू नये म्हणून बावीस टीन द्रावणात कांडे बुडवून १ तास ठेवून लागवड केली.
• दोन अडीच महिन्यानंतर बाळ (छोटी) बांधणी केली.
• चार- पाच महिन्यानंतर मोठी बांधणी करून कोंबडखत व एनपीआर, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अधिक असलेल्या लिंबोळी पेंड, इतर खते वापरली.
• तणनाशक न वापरता खुरपणी केली.
• आवश्यकतेनुसार दर दोन महिन्यांनी पाण्यातून खते औषध सोडली.
• पाण्याचे योग्य नियोजन केले.
पाचटापासून केली खत निर्मिती
उसातील पाचट न पेटवता त्याचा वापर शेतातच सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी केला आहे. पाचटावर सिंगल सुपर फॉस्फेट व युरिया असे मिश्रण करून त्याचा वापर केला.खोडवा उसात साठ दिवसांनी रोटर फिरवून पाचट व माती एकत्र मिसळून जमिनीत व्यवस्थित गाडले. ते व्यवस्थित कुजवले. अशाप्रकारे खतनिर्मिती करण्यावर भर दिला. यामुळे जमिनीची सुपीकता टिकते व तण कमी होतात.
एकरी आलेला खर्च व मिळणारे उत्पन्न
ऊस बियाणे – १२,०००
मशागत – ६०००
लागवड – ५०००
२ खुरपणी – ७०००
सरी फोडणी – ६५००
शेणखत कोंबडखत – २०,५००
खत औषध – ३०,०००
इतर – ३०००
एकुण खर्च (सरासरी) – ९०,०००
प्रति एकरी मिळणारे उत्पादन (सरासरी) – ८५-९० टन
प्रति एकरी मिळणारे उत्पन्न (सरासरी) – ३ लाखाहून अधिक
” ऊस हे हक्काचा नफा मिळवून देणारे हुकूमी पिक आहे. गेल्या २५ वर्षापासून मी ऊस शेती करत आहे. ऊस पिकाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी ५३ कारखाने व संशोधन संस्थाना भेटी दिल्या आहेत. कृषी विभागातील अधिकारी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, भिमाशंकर कारखाना शेतकी विभाग यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे सातत्याने ऊस शेतीत नवनवीन जातींची लागवड करून बियाणे तयार करण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्राबरोबर उत्तरप्रदेश राज्यात ही मी शेतकऱ्यांना बियाणे दिले आहे.”
– बाळासाहेब पडवळ, ऊस उत्पादक शेतकरी





