पुणे जिल्हा | ऊस पिके भुईसपाट पारगावात पुराचा फटका

पारगाव, (वार्ताहर)- भीमा नदीला चार दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस पिके भुईसपाट झाली आहेत. गुरुवार (दि.२५) खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला होता. त्यामुळे भीमा नदी क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहू लागल्याने भीमा नदीने महापुराचे स्वरूप धारण केले होते.
हे पाणी नदीकाठच्या शेतात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पारगाव येथील पंडितराव ताकवणे यांच्या शेतातील उभा ऊस व लागवड केलेला ऊस असा एकूण १४ एकर उसाचे नुकसान झाले आहे.
विजेचे पोल, स्टाटर बॉक्स, फुटबॉल पाईप यांचे नुकसान झाले आहे. सुहास व स्वप्नील ताकवणे यांचा ५ एकर ऊस तसेच केशव ताकवणे ,शरद ताकवणे, दत्तात्रय बांदल आदी शेतकऱ्यांच्या शेकडो एकर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. तरी संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.



