Pune District : विद्युत वाहक तारांच्या घर्षणाने उसाला आग

नारायणगाव : विद्युत वाहक तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या आगीच्या गोळ्यांमुळे नारायणगाव येथील शेतकरी नवनाथ भुजबळ व विजय भुजबळ यांच्या मालकीच्या तीन एकर क्षेत्र असलेल्या उसाला शुक्रवारी आग लागली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विद्युत वाहकतारांमध्ये घर्षण होऊन ऊसाला आग लागली असल्याचे शेतकरी भागेश्वर भुजबळ यांनी बघितले असता त्यांनी तात्काळ नवनाथ भुजबळ व आपला मित्र पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांना कळविले. एक महिन्याच्या कालावधीत ऊस तुटणार असल्याने पाचटाचे प्रमाण जास्त होते. आगीने रौद्ररूप धारण केले व ऊसाला लागलेली आग सर्व दूर पसरली.
महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी डोंगरे यांना घटनेची माहिती समस्त त्यांनी ताबडतोब वीजपुरवठा खंडित केला. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. महावितरण विद्युत पुरवठा खंडित केल्याने आग विझविण्यासाठी पाण्याचे पंप सुरू करण्यास अडथळे निर्माण झाले. उसाच्या क्षेत्रातील पाण्याच्या ड्रिपच्या नळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी महावितरण कडे केली आहे.
घटनेची माहिती समजताच नारायणगाव पोलीस स्टेशनचे ग्रामसुरक्षा दलाचे जवान पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल आनंदा चौगुले, जितेंद्र पाटील, जवान आदित्य डेरे, शंतनू डेरे, युवराज जवळेकर, नवनाथ भुजबळ, भागेश्वर भुजबळ, अनिकेत भुजबळ, सुशील ढवळे, विजय भुजबळ, आकाश मंडलिक यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
महावितरण अधिकार्यांचा आडमुठेपणा
ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या शेतातून विद्युत वाहक तारा व रोवलेले खांब यांची दयनीय अवस्था झालेली दिसून येते. वीज वाहक तारा जमिनीच्या दिशेने लोंबलेल्या अवस्थेत तर खांब वाकलेल्या अवस्थेत आहेत. शेतकरी अनेक वेळा महावितरणच्या अधिकार्यांकडे तक्रार करीत असतात; परंतु महावितरणचे अधिकारी शेतकर्यांच्या तक्रारींची वेळीच दखल घेत नसल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे.





