कोरेगाव : जयपूर (न्हावी), ता. कोरेगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या शिवनेरी शुगर्स लिमिटेड हा साखर कारखाना या वर्षी पूर्ण क्षमतेने आपला पहिला गळीत हंगाम घेत असून दि. २० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत गळीत केलेल्या ऊसाचे प्रति मे.टन रू ३२००/- प्रमाणे ऊस बिल संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा केले असल्याची माहिती शिवनेरी शुगर्सचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर सुशांत श्रीमंत पाटील यांनी दिली. तसेच शेतक-यांनी बँकेशी संपर्क साधावा असे ही आवाहन त्यांनी केले. शिवनेरी शुगर्स लि. या कंपनीने २०२३-२४ वर्षात विक्रमी कालावधीत कारखान्याची उभारणी पूर्ण केली करून चाचणी गळीत हंगाम घेतला होता. २०२४-२५ हंगामात पुर्ण क्षमतेने कारखान्याचे गाळप सुरू आहे. चालू गळीत हंगामात दि. २९.१२.२०२४ अखेर १.७० लाख मे.टन ऊस गाळप केले असून सरासरी १०.२५ टक्के साखर उतारा राखत १ लाख ७० हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामात ६ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठरविले आहे. शेतक-यांचे हित विचारात घेवून चालू गळीत हंगामातील गाळपास आलेल्या संपुर्ण ऊसाचे पेमेंट दर पंधरवडयास एकरक्कमी रू.३२००/- प्र.मे. टन प्रमाणे अदा करणार असल्याची माहिती सुशांत पाटील यांनी दिली. तसेच त्यांनी ऊस पुरवठादार शेतक-यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले. याप्रसंगी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.