Sugar Season 2025: मार्चमध्येच कारखान्यांचे धुराडे बंद होणार? साखर आयुक्तांचा मोठा अंदाज..वाचा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम दि. १ नोव्हेंबरपासून सुरू झालेला आहे. हा हंगाम (दि.१५) मार्चपर्यंत चालू राहिल, अशी शक्यता साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली. राज्यातील साखर कारखान्यांनी अंदाजित एकूण उसाच्या निम्म्या उसाचा गाळप केल्यानंतर त्यांनी हा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, यंदाचा कारखान्यांचे धुराडे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बंद होणार असल्याचे आकडेवारीनुसार व्यक्त होत आहे.
(दि.३०) सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यात १३.७१ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे होते. तर मिटकॉनने १६.०६ लाख हेक्टरमध्ये ऊस लागवड झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता.
कृषी विभागाच्या अंदाजानुसार प्रति हेक्टर सरासरी ७६ टन उत्पादनाप्रमाणे १०४४ लाख टन ऊस पिकेल, असा अंदाज होता. गाळपास ९४० लाख टन ऊस येईल, असे म्हटले होते. त्यानंतर मिटकॉनच्या आकडेवारीनुसार राज्यात १२६४ लाख टन ऊस असून त्यापैकी १०३७ लाख टन ऊस कारखान्यांत गाळपासाठी येण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
(दि.१) नोव्हेंबरपासून आतापर्यंत ६ कोटी २० लाख टन ऊस गाळप झाला असून त्यातून ५५ लाख टन साखरेचे उत्पादन करत ८.८२ टक्के सरासरी उतारा मिळवला आहे. राज्यात सध्या १०१ सहकारी आणि १०० खासगी, असे २०१ साखर कारखाने कार्यरत आहेत. यात सहकारी कारखाने गाळपाबाबत सर्वात पुढे आहेत. त्यांनी ३ कोटी १० लाख टन गाळप केले आहे.
त्यातून त्यांनी सरासरी ३० लाख टन साखरेचे उत्पादन करीत ९.४२ टक्क्यांचा उतारा मिळवला आहे. खासगी कारखान्यांनी ३ कोटी ९ लाख ऊस गाळप करीत २५ लाख टन साखर उत्पादन केले आहे. ८.२८ टक्क्यांच्या उताऱ्यामुळे खासगी कारखाने उताऱ्यात मागे आहेत. मात्र, हा फरक इथेनॉल उत्पादनामुळे दिसत असल्याचे साखर आयुक्तांचे म्हणणे आहे.
धाराशिवचा सहभाग असलेल्या सोलापूर विभागात एकूण ४६ साखर कारखाने सुरू आहेत. त्या पाठोपाठ कोल्हापूर विभाग असून सांगली जिल्ह्यात १५ आणि कोल्हापूर जिल्ह्यात २२ असे ३७ कारखाने गाळप करीत आहेत. सातारा जिल्ह्याचे १७ आणि पुणे जिल्ह्याचे १४, असे पुणे विभागात ३१ कारखाने गाळप करीत आहेत. अहिल्यानगर विभागात २७, छत्रपती संभाजीनगर विभागात २५, नांदेड विभागात २९ आणि नागपूर विभागात २ साखर कारखाने सुरू आहेत.
पुणे विभागात १ कोटींहून अधिक गाळप
पुणे विभागात १ कोटी ४५ लाख ३ हजार ९६६ टन ऊस गाळप झाले आहे. तर साखर पोत्यांचे उत्पादन १ कोटी ३१ लाख ९३ हजार २३७ क्विंटल इतके झाले आहे. पुणे विभागातील सरासरी साखर उतारा हा ९.१ टक्के इतका आहे. सोलापूर विभागात १ कोटी ३४ लाख ८४ हजार १९५ टन ऊस गाळप झाले आहे.
१ कोटी ७ लाख ३३ हजार ३५५ क्विंटल इतके उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ७.९६ टक्के आहे. पुणे विभागातील सरासरी साखर उतारा कमी असल्याने साखर कारखाने, शेतकऱ्यांना याची झळ बसत आहे.

