पुणे जिल्हा | सैनिक, पोलिसांच्या गावची सुधा बनली फौजदार

नीरा, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील सैनिक आणि पोलिसांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी गावातील माजी सैनिकाची कन्या असलेली सुधा भोसले ही तरुणी एमपीएससीद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवून पीएसआय पदासाठी पात्र ठरली आहे.
तीच्या या यशाबद्दल पिंगोरी येथील ग्रामस्थांनी तिचा नागरिक सत्कार करून तिचं कौतुक केले आहे. तर यावेळी तिच्या आईवडिलांचा देखील ग्रामस्थांनी सत्कार केला आहे.
पिंगोरी गावचे सरपंच संदीप यादव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, माजी उपसरपंच प्रकाश शिंदे, यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुषमा भोसले,सेवा निवृत्त कॅप्टन शामराव शिंदे,झीळ तुळशीराम शिंदे ,पोपट शिंदे, अमोल शिंदे,संजय शिंदे,वसंत शिंदे,रुपेश यादव,सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे, धनंजय शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
भारतीय सैन्यामध्ये सेवाबजालेल्या सत्यवान भोसले यांची ही कन्या. आपल्या वडिलांप्रमाणेच आपण शासकी सेवेत जाऊन देशसेवा करावी ही तिची इच्छा होती. तिच्या घरातील सर्वच लोकांनी तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला प्रोत्साहन दिले.
2022 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेमध्ये तिची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पीएसआयपदी निवड करण्यात आली. सुधाने प्राथमिक शिक्षण पिंगोरी येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण श्रीवाघेश्वरी माध्यमिक विद्यालयात घेतले.
उच्च शिक्षण तिने पुण्यात घेतले. स्पर्धा परीक्षेसाठी तिने घरूनच अभ्यास केला. आहे त्या परिस्थितीत आपण लक्ष देऊन अभ्यास केला तर यश निश्चित मिळत असे सुधाने नमूद केले.





