‘लग्नानंतर ब्रिटनचे पंतप्रधान दर गुरुवारी…’ – सासूबाई सुधा मूर्तींनी सांगितलं…

लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे अनेकदा चर्चेत असतात. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या पंतप्रधान होण्यामागे कोणाचा हात आहे हे सांगण्यात आले आहे. खरं तर, हा व्हिडिओ ब्रिटीश पंतप्रधानांच्या सासू आणि आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचा आहे. यामध्ये त्यांनी दावा केला आहे की त्यांच्या मुलीमुळे ऋषी सुनक हे ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत.
इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुधा मूर्ती म्हणाल्या की, मी माझ्या पतीला बिझनेसमन बनवले. तर माझी मुलगी अक्षताने तिच्या पतीला ब्रिटनचे पंतप्रधान केले. याचे कारण म्हणजे पत्नीचा महिमा. बायको नवऱ्याला कशा पद्धतीने बदलू शकते बघा. मी माझ्या पतीला उद्योगपती बनवले आणि माझ्या मुलीने तिच्या पतीला पंतप्रधान केले.
सुधाने अक्षता आणि सुनक एकमेकांची काळजी कशी घेतात हे देखील सांगितले. त्या म्हणाल्या की, अक्षताला नेहमी सुनकच्या जेवणाची काळजी असते. दुसरीकडे, सुनक आपल्या परंपरांची खूप काळजी घेतो. मूर्ती कुटुंबात दर गुरुवारी उपवास करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. सुनक सुरुवातीपासून इंग्लंडमध्ये राहत असला तरी तो खूप धार्मिक आहे. त्यांनी माझ्या मुलीशी लग्न केले आणि ते मूर्ती कुटुंबाची परंपरादेखील सांभाळतात. लग्न झाल्यापासून ते गुरुवारी उपवास करत आहेत. तर त्यांची आई दर सोमवारी उपवास करते.
स्टॅनफोर्ड विद्यापीठात एमबीए करत असताना ऋषी सुनक यांची अक्षता मूर्तीशी भेट झाली. अक्षता इन्फोसिसचे संस्थापक एन. नारायण मूर्ती आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा नारायण मूर्ती यांच्या कन्या. अभ्यासादरम्यान दोघांनीही आपलं हृदय एकमेकांना दिलं होतं. 2009 मध्ये दोघांनी बंगळुरूमध्ये भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले. अक्षता इंग्लंडमध्ये स्वतःचा फॅशन ब्रॅंडही चालवते. आज ती इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. सुनक दाम्पत्याला कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.
ऋषी सुनक यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. 2015 मध्ये त्यांनी रिचमंडमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. 2017 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. यानंतर 13 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांना इंग्लंडचे अर्थमंत्री बनवण्यात आले. त्याच वर्षी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आरोपांना सामोरे जावे लागले तेव्हा ऋषी सुनक यांनी राजीनामा दिला. यानंतर नवीन पंतप्रधानपदासाठी निवडणूक सुरू झाली. यामध्ये ऋषी सुनक हे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले.





