…अन् सुधा मूर्ती यांनी भर मंचावर शाहू महाराज छत्रपती यांच्या पडल्या ‘पाया’

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळक पुरस्कार राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांना नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांचा समावेश आहे.
यादरम्यान सुधा मूर्ती यांच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुद्धा मूर्ती यांनी पुरस्कार स्वीकारताना शाहू महाराज छत्रपती यांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी या कार्यक्रमात मराठीत भाषण केलं. त्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाल्या,’मराठी आणि कानडी माझी आई आहे. कृष्णासारख्या मलाही दोन आई…”, असं सुधा मूर्ती म्हणाल्या. ‘देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करताना मला मिळालेलं समाधान अवर्णनीय आहे’, अशीदेखील भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली.
सुधा मूर्तींकडून आपल्या भाषणात वाघनखांचा उल्लेख करण्यात आला. ‘मी लहानपणी नेहमी आईला विचारायचे की शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजल खान मारला ते कुठे आहेत? इंग्रज घेऊन गेले इतकच माहिती होतं. मी इंग्लडला गेले तेव्हा त्या म्युझीयममध्ये मी वाघनखे पाहिली तेव्हा मी पाया पडले. मी आज शाहू महाराजांच्या पाया पडणार आहे. कारण ते शिवाजी महाराजांचे वंशज आहेत.’ असं म्हणत सुधा मूर्ती या शाहू महाराजांच्या पाया पडल्या.
दरम्यान कार्यक्रमात उपस्थित शरद पवार यांनी सुधा मूर्ती यांचं अभिनंदन केलं. शरद पवार म्हणाले,’देशासाठी योगदान दिलेल्या अनेक मान्यवरांना हा पुरस्कार दिला आहे. सुधा मूर्ती यांना यंदाचा पुरस्कार दिला जातोय त्याचा मला आनंद आहे. देश स्वतंत्र होत असताना अनेकांनी कणखर भूमिका मांडली. त्यात लोकमान्य देखील होते. लोकमान्य टिळक यांची काळजी घेण्याची भूमिका तेव्हा शाहू महाराज यांनी घेतली होती. सुधा मूर्ती यांचं मनापासून अभिनंदन करतो. लोकांना हाताला काम देण्याचं काम इन्फोसिस करतं. ते काम नारायण मूर्ती यांनी केलं. त्यात साथ देण्याचं काम सुधा मूर्ती यांनी केलं. त्यांचं यातलं योगदान महत्त्वाचं आहे.’ असेही शरद पवार म्हणाले.





