लक्ष्मीपूजनाची साताऱ्यामध्ये जय्यत तयारी; सायंकाळी सहा ते साडेआठ पूजनाचा मुहूर्त

सातारा – नरक चतुर्दशीच्या दीपोत्सवानंतर सातारकर लक्ष्मीपूजनाचा मुख्य दिवाळी सण साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आश्विन अमावस्या सार्थकी लावण्यासाठी योग्य मुहूर्तावर पूजा होणार आहे. यामुळे आपल्याला वर्षभर सुख-समृद्धी ऐश्वर्य धनसंपदा प्राप्त होते, अशी भावना असल्याने हा मुहूर्त साधण्यासाठी सातारकरांनी तयारी केली आहे.
नरक चतुर्दशीच्या दीपोत्सवाचा साताऱ्यामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. सज्जनगड येथे मशाल महोत्सव आणि दिवाळी पहाट कार्यक्रमाचा सातारकरांनी आनंद लुटला. सुवर्ण खरेदी, फराळ खरेदी, फटाके खरेदी यासह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी सातारकरांनी हजेरी लावली. सायंकाळी घरात दीपोत्सव साजरा करत यमदीप दान केले. शुक्रवारी लक्ष्मीपूजन साजरे होत आहे. लक्ष्मीपूजनांचे व्यापारी वर्गासाठी विशेष महत्त्व आहे त्याची जय्यत तयारी साताऱ्यामध्ये दिसून आली. लक्ष्मीपूजनासाठी नवीन कपडे खरेदी तसेच समृद्धीसाठी श्री लक्ष्मी यंत्र दागिने आणि चांदीची नाणी चौरंग लाल रंगाचे कापड या खरेदीसाठी सातारकरांनी गर्दी केली होती.
लक्ष्मीला लाह्या आणि बत्तासे यांचा नैवेद्य दाखवण्यासाठी त्या नैवेद्याच्या खरेदीची गर्दी दिसून आली. तसेच संपूर्ण घर स्वच्छ करणाऱ्या लक्ष्मीच्या खरेदीसाठीही लगबग दिसत होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरांवर झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. 80 ते 100 रुपये किलोने झेंडूची फुले बाजारपेठेत उपलब्ध होती. दरम्यान, सायंकाळी सहा ते साडेआठ या वेळेत लक्ष्मीचे आवाहन करून तिची पूजा सिद्ध करावी, अशी माहिती पंडित योगेश शास्त्री प्रभुणे यांनी दिली आहे.





