Satara | सातार्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी

सातारा, (प्रतिनिधी) – श्री गणरायाच्या आगमनाला केवळ दोन आठवडे उरले असून, सातारा शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. सातारा पालिकेने शहरातील आगमन व विसर्जन मिरवणूक मार्गाची दुरुस्ती हाती घेतली आहे.
विविध परवानग्यांसाठी आणि कुंभारवाड्यांमधून श्रींच्या मूर्ती नेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्याची लगबग सुरू आहे.
गणेशाच्या आगमनाला दोन आठवडे राहिल्याने कुंभारवाड्यात मूर्तिकारांचे हात आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यात गुंतले आहेत.
शहरासह जिल्ह्यातील कुंभारवाड्यांमध्ये, घरोघरी आणि कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती बनवण्याची हातघाई दिसत आहे. यंदा डायमंड, फेटा व धोतर नेसवलेल्या गणेशमूर्तींना बाजारपेठेत मागणी वाढली आहे.
यंदा गणेशोत्सव शनिवार, दि. 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे कुंभारबांधवांना गणेशमूर्ती घडवण्यासाठी लगबग सुरू आहे. तयार गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे.
घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे कोरीव काम केले जात आहे. अनेक कुंभारांकडून कच्च्या गणेशमूर्ती परगावी पाठवल्या जात आहेत. अनेक ठिकाणी मूर्तींचे रंगकाम सुरू आहे.
यावर्षी घरगुती गणेशमूर्ती एक ते तीन फूट उंचीच्या तयार करण्यात येत आहेत. घरगुती गणेशमूर्तींच्या किमती दीड हजार ते दहा हजार रुपये, तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींच्या किमती दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहेत.
यंदा शाडूच्या मूर्तींची संख्या वाढली आहे. गणेशभक्तांना आकर्षित करण्यासाठी बाप्पांच्या नवनवीन संकल्पनेतील मूर्ती तयार करण्यात येत आहेत. ऑर्डरनुसार या मूर्तींचे रंगकाम करण्यावर भर दिला जात आहे.
कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना मागणी
नागरिकांचे पर्यावरणाविषयी प्रबोधन झाल्याने गेल्या काही वर्षांत शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. लालबाग, दगडूशेठ, मोरावरील गणेश, तुतारीवरील गणेश, झोपाळ्यावरील गणेश,
स्वामी समर्थ अवतार, चौरंगावरील गणेश, फेटा, धोतर आणि डायमंड वर्क केलेल्या गणेशमूर्तींना सध्या मोठी मागणी आहे.
जय मल्हार, बालगणेश, तांडव अवतार, शिव अवतारातील घरगुती गणेशमूर्तींनाही विशेष मागणी आहे. गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्यांसाठी सातारा पालिकेत ‘एक खिडकी’ योजना येत्या दोन दिवसांत सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.





