सुबोधकुमार जयस्वाल यांनी स्वीकारला CISF प्रमुखपदाचा कार्यभार

नवी दिल्ली – वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांनी शुक्रवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी पोलीस प्रमुख असणारे जयस्वाल प्रतिनियुक्तीवर केंद्राच्या सेवेत दाखल झाले आहेत.
जयस्वाल आता 1 लाख 62 हजार जवान आणि अधिकाऱ्यांचा समावेश असणाऱ्या सीआयएसएफचे नेतृत्व करणार आहेत. सीआयएसएफवर देशातील विमानतळांबरोबरच अवकाश आणि आण्विक संस्थांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.
त्या दलाच्या महासंचालकपदी कार्यरत राहण्याची संधी जयस्वाल यांना सुमारे पावणे दोन वर्षांच्या कालावधीसाठी मिळेल. ते सप्टेंबर 2022 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. जयस्वाल भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) 1985 च्या तुकडीमधील अधिकारी आहेत.
याआधी केंद्राच्या सेवेत असतानाही त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एसपीजी) ते घटक होते. त्याशिवाय, रॉ या गुप्तचर संस्थेतील कार्याचा अनुभवही त्यांच्या गाठिशी आहे.





