Manchar : तातडीच्या उपचारांनी उपकोषागार अधिकाऱ्याला जीवदान
Manchar : ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून दांगट यांना रुग्णवाहिकेतून तातडीने पुढील उपचारासाठी पाठविले.

मंचर : घोडेगाव तहसीलदार निवासस्थान येथे राहणारे उपकोषागार अधिकारी विजय अनंत दांगट (वय ५५) यांना गुरुवार, दि.१७ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांना तातडीने घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. तातडीच्या वैद्यकीय प्राथमिक उपचारामुळे त्यांना जीवदान मिळाले आहे.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून दांगट यांना रुग्णवाहिकेतून तातडीने पुढील उपचारासाठी पाठविले. रुग्णालयातील पथकाने पूर्वतयारी केल्याने रुग्ण दाखल होताच अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. हृदयातील रक्तप्रवाह पूर्ववत करण्यासाठी स्ट्रेप्टोकिनेज हे औषध देण्यात आले.
यावेळी मंचर येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित बोचरे हेही तातडीने रुग्णालयात दाखल झाले. औषधोपचारादरम्यान दांगट यांचा रक्तदाब कमी झाला. डॉ. बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदाब वाढविण्यासाठी औषधोपचार सुरू करून तो पूर्ववत करण्यात आला. उपचारानंतर छातीतील वेदना पूर्णपणे थांबल्या असून रक्तदाब, नाडीचे ठोके व प्राणवायूचे प्रमाण सामान्य झाले.
डॉ. अभिजित बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली थ्रोम्बोलिसिस केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. रामप्रसाद धायकर, डॉ. अर्जुन दिघे, तळेघर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल जोशी, डॉ. साहिल टाके, अंजली इंदोरे, परिचारिका वॉर्ड सहायक प्रज्वल नेहरकर आणि योगेश वाडेकर यांनी उपचार केले. पुढील उपचारासाठी दांगट यांना हृदयाची रक्तवाहिनी तपासणी (अँजिओग्राफी) करण्यासाठी पाठविण्यात आले.





