मित्रांसोबतची स्टंटबाजी ठरली जिवघेणी ! तलावाच्या सांडव्यावर चढलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

नागपूर – तलावाच्या सांडव्यावर उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्या एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरालगतच्या मकरधोकडा तलावात घडली. या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीच्या निमित्ताने उमरेड येथील मकरधोकडा तलाव परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. त्यावेळी आकाश घनश्याम चकोले नामक 23 वर्षीय तरुणाने मित्रांच्या मदतीने तलावाच्या सांडव्याच्या भिंतीवर चढण्याचाी प्रयत्न केला.
त्यात तो यशस्वीही झाला. तो सांडव्याच्या भिंतीवर उभे राहून हात दाखवून स्टंट करू लागला. तेवढ्यात त्याच्या दुसऱ्या एका मित्राने वर येण्याचा प्रयत्न केला. त्याला तो हाताने धरून वर खेचू लागला. पण मित्राचा हात घसरल्यामुळे आकाश मागच्या बाजूला तोल जाऊन खोल तलावात पडला. हा संपूर्ण प्रकार एका पर्यटकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
दुर्दैवाने आकाशला पोहता येत नव्हते. त्यामुळे काही क्षणांतच त्याचा बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी शेकडो पर्यटक उपस्थित होते. पण तलावाची भींत उंच असल्यामुळे कुणालाही त्याला वाचवता आले नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश चकोले हा नागपूर जिल्ह्यातील कळमना येथील गोपाल नगर येथील रहिवासी होता. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. तो आढळला किंवा नाही हे समजू शकले नाही. पण या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.





