सातारा – सातारा जिल्ह्यातील सडावाघापूर पठारावरील उलटा धबधबा आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे नेहमीच गर्दी असते. मात्र, येथे रिल्स आणि फोटोंच्या नादात स्टंट करणाऱ्या तरुणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक धक्कादायक घटना गुजरवाडी येथील टेबल पॉईंटवर घडली, जिथे कराड येथील साहिल जाधव (वय २०) हा युवक कारसह ३०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास साहिल आणि त्याचे मित्र सडावाघापूर येथे फिरण्यासाठी आले होते. मित्र खाली उतरले असताना साहिलने मोबाईल रिल्ससाठी कारसह स्टंट करण्याचा प्रयत्न केला. गाडी एकाच जागी फिरवताना रिव्हर्स गिअरमध्ये गाडीचा ताबा सुटला आणि ती थेट दरीत कोसळली. सुदैवाने, म्हावशी येथील गुराखी मंगेश जाधव आणि किंगमेकर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी साहिलला दरीतून बाहेर काढले. त्याला गंभीर दुखापत झाली असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पाटण पोलीस स्टेशनचे निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पर्यटकांच्या स्टंटबाजीवर अंकुश घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.