पुणे जिल्हा | विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करिअर करा

लोणी काळभोर, (वार्ताहर) – विद्यार्थी हा उद्याच्या विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. भारताच्या या युवा पिढीने कधीही हताश न होता, शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वीरित्या करिअर करावे.
दुसर्याच्या यश-अपयशाचा विचार न करता, केवळ आपले काम, प्रतिभा व तत्वांवर ठाम राहून कष्ट केल्यास कुठल्याही क्षेत्रात यश नक्कीच मिळते, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.
येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत समारंभा प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, यू. आर. राव उपकेंद्र, बंगळुरूचे संचालक डॉ. एम. शंकरन,
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालिका प्रा. डॉ. सुनिता कराड, ज्योती ढाकणे-कराड, डॉ. विनायक घैसास, डॉ. सुचित्रा नागरे, प्रकुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ ज्ञानदेव नीलवर्ण आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले अध्यात्माचा संबंध हा प्रत्येकाच्या जीवनाशी व जीवनातील प्रत्येक गोष्टीशी असतो. आर्थिक प्रगतीसाठी मानवाची सांस्कृतीक प्रगतीही तितकीच महत्त्वाची असते.
मुल्याधिष्ठीत व संस्कृतीची जाण असणारे विद्यार्थी घडविण्याचे काम एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या माध्यमातून घडत आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनाच्या माध्यमातूनच आपण गरिबी दूर करू शकतो आणि अशाच प्रकारच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे काम या विद्यापीठाकडून घडत आहे. एम. शंकरन म्हणाले, आपण कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, हे भारताने नुकतेच जगाला दाखवून दिले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि स्वाभिमान बाळगूण देशाचे नाव वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
आपल्या देशात जगात कोणाकडेही नाही अशी प्रतिभावंत युवा पिढी आहे आणि याच युवा पिढीच्या खांद्यावर आता डॉ. कलाम यांनी दाखवलेल्या प्रगत देशाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. विद्यार्थी केवळ स्वतः कष्टाने जीवनात यशस्वी होत नाही.
तर त्याच्या यशामागे, संस्थेसह अनेकांचा हातभार लागलेला असतो. त्यामुळे आता पदवी घेऊन समाजात प्रवेश करत असताना आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो, याचे कायम भान ठेवा, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. पसायदानाने सांगता झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा स्नेहा वाघटकर व प्रा स्वप्निल शिरसाठ यांनी केले. डॉ. पुजेरी यांनी आभार मानले.
एकूण 2972 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विश्वशांती प्रार्थनेद्वारे सुरू झालेल्या या कार्यक्रमात विद्यापीठातील 22 पीएचडी, 53 सुवर्णपदके व 194 विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र यांसह एकूण 2972 विद्यार्थ्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पदवी बहाल करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थ्यांसह 8 हजारपेक्षा अधिक लोकांनी देशभरातून हजेरी लावली. तसेच यावेळी राजदंडासह काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
एमआयटी एडीटीने एक चांगला विद्यार्थी घडविण्या सोबतच एक मुल्याधिष्ठीत मनुष्य जो अध्यात्म व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशिल असतो, असे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.
या दीक्षांत समारंभाच्या माध्यमातून आज पदवी मिळविणार्या सर्व विद्यार्थ्यांनीही भारताच्या उज्वल भविष्यात आपला अनमोल वाटा द्यावा.-प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, संस्थापक अध्यक्ष, माईर्स एमआयटी शिक्षण समूह





