ओझर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल, शिरोली बुद्रुक येथील स्काऊट गाइड, आर.एस.पी. आणि राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या विघ्नहर ओझर गणपतीच्या जन्मोत्सवानिमित्त तिसऱ्या महाद्वारामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी त्यांनी गणेश भक्तांना विविध प्रकारच्या सेवा पुरविल्या. मंगळवारी, दि. २६ ऑगस्ट रोजी श्री गणेशाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित पालखी सोहळ्यात गणपती आपल्या बहिणींना आमंत्रित करण्यासाठी शिरोली खुर्द येथे जात असताना शिरोली बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांनी भाविकांसाठी पाणी, चहा, खिचडी, केळी, वेफर्स, पेढे यासारख्या प्रसादाचे वाटप केले. तसेच, परिसर स्वच्छता, रस्त्यावरून जाणाऱ्या पायी भाविकांना व वाहनांना योग्य मार्गदर्शन करणे आणि गर्दीचे नियंत्रण करणे यांसारख्या सेवाकार्यामध्ये योगदान दिले. या प्रसंगी तेजेवाडी गावचे ग्रामस्थ, सरपंच आणि यात्रा कमिटी यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यात शाळेच्या पर्यवेक्षिका गाइड कॅप्टन अनघा घोडके, स्काऊट गाइड विभागप्रमुख रंजना मुंढे, शिक्षिका रुपाली नलावडे, प्रियांका पादीर, शोभा कवडे, स्काऊट मास्टर जनार्दन खेडकर, अक्षय पाटोळे, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख संतोष देवकुळे, किशोर नलावडे, संजय मोरे, आशा चव्हाण, शैला गायकवाड, सुरेखा बांगर, आर.एस.पी. विभागप्रमुख सुरेखा भोरले, तुकाराम निधन, कविता ढेरंगे, मयूर जगताप, सुभाष हांडे आणि शाळेतील सेवक कैलास बोभाटे यांनी सहभाग घेतला. शाळेतील सर्व विद्यार्थी या सोहळ्यात उपस्थित होते आणि त्यांनी गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेचा आनंद लुटला.या सेवाकार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावनेची भावना रुजण्यास मदत झाली, असे शाळेच्या शिक्षकांनी सांगितले.