खोडद- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निमगाव सावा येथील कुकडी नदीपात्राची साफसफाई केली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत गाडगे, प्रा. अनिल पडवळ, प्रा. शिवाजी साळवे, प्रा. सुजाता ऐंध्ये, प्रा.नयना पावडे या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्वछता मोहीम राबविली.
यामध्ये 64 विद्यार्थ्यांसह निमगाव सावा येथील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पत्रावळ, फुलांचे हार, प्लॅस्टिक, जुनी कापडे, पाण्याच्या बॉटल, कागद, गणेश विसर्जनातील निर्माल्य यासारखा कचरा गोळा करून नष्ट केला. या स्वच्छता अभियानाचे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, निमगावचे सरपंच सुनीता घोडे, माजी उपसरपंच गोविंद गाडगे यांनी कौतुक केले.