Student protest : “विद्यार्थ्यांना उजव्या विचारसरणीच्या गुंडांकडून धमक्या येत आहेत..”; ‘आप’चे खळबळजनक विधान, संरक्षण देण्याचे केले आश्वासन
जंतरमंतरवरील शांततापूर्ण आंदोलनात भाग घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला दिल्लीत उजव्या विचारसरणीच्या गुंडांकडून धमक्या येत असतील, तर घाबरू नका.

Student protest – जंतरमंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात शांततेने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना उजव्या विचारसरणीच्या गुंडांकडून धमक्या येत असल्यास आम आदमी पक्ष त्यांना पूर्ण संरक्षण देईल, असे आश्वासन आपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी शुक्रवारी दिले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिल्ली जेन-झेडला उद्देशून लिहिलेल्या पोस्टमध्ये भारद्वाज म्हणाले, जंतरमंतरवरील शांततापूर्ण आंदोलनात भाग घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला दिल्लीत उजव्या विचारसरणीच्या गुंडांकडून धमक्या येत असतील, तर घाबरू नका.
त्यांना घरी बोलवा आणि आम्हाला कळवा; आम्ही त्यांच्याशी योग्य प्रकारे निपटू. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सौरभ भारद्वाज यांची ही पोस्ट रिपोस्ट करत या गुंडांना ताळ्यावर आणण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ असे म्हटले आहे.
दिल्ली सरकारच्या गृह विभागाने गुरुवारी जारी केलेल्या एका आदेशानंतर आप नेत्यांची ही विधाने आली आहेत. गृह विभागाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, या आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तीवर आता कोणतीही कायदेशीर किंवा कठोर कारवाई केली जाणार नाही.
तसेच, या प्रकरणात आधीच अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या नागरिकांच्या प्रकरणांचा पुनर्विचार करून त्यांची लवकरात लवकर सुटका केली जाईल, असेही या आदेशात म्हटले आहे. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि आंदोलनात सहभागी झालेल्या व्यक्तींवरील कारवाई कायम राहील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.





