परभणीत जातीवरून छळ करत विद्यार्थ्याला बेदम मारहाण

परभणी : राज्यात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. अशातच आता परभणीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जातीवरून छळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका तरुणाला शाळेतील चार विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना परभणीतील सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे घडली आहे. रामेश्वर मधूकर उफाडे (वय १७) असं मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेत तो जखमी झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याची प्राथमिक मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रामेश्वर उफाडे सोनपेठ येथील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात अकरावीत (विज्ञान शाखेत) शिक्षण घेत आहे. त्याचा काही विद्यार्थी सातत्याने जातीवरून छळ करीत होते. दररोजच्या या त्रासाला कंटाळून २४ मार्च रोजी रामेश्वरने त्यांना जाब विचारला.
२५ मार्च रोजी सकाळी त्याला सारंग खरात (दुधगाव), ओमकार शिंदे (रा. गवळी पिंपरी), विश्वजीत जाधव (रा. गवळी), आणि एक अज्ञात युवक अशा चौघांनी काठीने आणि फायटरने जबर मारहाण केली. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत रामेश्वरला इतर मित्रांनी पोलीस स्टेशनला नेले. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. दरम्यान, नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी ठाण मांडल्यानंतर सोनपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
भर दिवसा तरुणाचा गळा चिरून खून
लातूर तालुक्यातील मुरुड शेजारील करकट्टा या गावी एका ४० वर्षीय तरुणाचा भर दिवसा गळा चिरून खून करण्यात आला. रविवारी दुपारी ही घटना घडली असून याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात पाच जणाविरुद्ध आरोपीच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली शरद इंगळे वय ३९ यांनी मुरुड पोलिसात तक्रार आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पाच आरोपीने आपले पती शरद प्रल्हाद इंगळे यांचा रविवारी करकट्टा येथील खडी केंद्रावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला करून खून आहे, या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी दिलेल्या तक्रारीत केली आहे.




