Pune District : एसटीचा हायटेक कारभारभार फसला!

इंदापूर : इंदापूर तालुक्यात सवलतीच्या दरात प्रवास करणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक,तसेच राज्य परीवहन महामंडळाच्या बसमधून प्रवासासाठी सवलत देण्यात येणार्या विविध प्रवर्गातील प्रवाशांना एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्ड देण्यात येत होते. परंतु, ही योजना अर्ध्यातच बारगळल्याने राज्य परिवहन महामंडळाचा हायटेक कारभार फसला आहे. पुन्हा सवलत धारक प्रवाशांना कागदी पास देण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
एसटी महामंडळाने 65 वर्षे पूर्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेतला. बस आगारातील आरक्षण कक्षामध्ये त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू केली. स्मार्ट कार्ड नोंदणी केल्यानंतर एक ते दोन महिन्यांनंतर स्मार्ट कार्ड देण्याची व्यवस्था करण्यात आली. एसटी महामंडळाच्या या उपक्रमाला ज्येष्ठांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून आरक्षण कक्षात स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी गर्दी होऊ लागली.
ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली. तसेच एसटीतून प्रवास करणार्या विद्यार्थ्यांसह अन्य पासधारक प्रवाशांनादेखील स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात केली. कागदी पासच्या जागी स्मार्ट कार्ड आल्याने विद्यार्थी व अन्य प्रवासीदेखील बदलत्या काळानुसार सुखावले; मात्र कालांतराने स्मार्ट कार्ड दिल्यानंतर त्यांच्या नुतनीकरणाची समस्या निर्माण झाली. स्मार्ट कार्ड दिल्यानंतर प्रत्येक वाहकाकडे स्मार्ट कार्ड रिडर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र स्मार्ट कार्ड दिल्यानंतर वर्ष-दोन वर्षे लोटुनही वाहकांच्या हाती स्मार्ट कार्ड रिडर देण्यात आले नाहीत. त्यामुळे अनेकदा स्मार्ट कार्डच्या वैधतेवरून वाहक व प्रवाशी यांच्यात वादावादीचे प्रसंग निर्माण होण्यास प्रारंभ झाला होता. यामुळे राज्य परीवहन महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना गुंडाळून सवलतधारक प्रवाशांकडून स्मार्ट कार्ड परत घेऊन पुन्हा कागदी पास देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
कंपनीच्या तांत्रिक कामात बिघाड
स्मार्ट कार्ड बनविण्याचे काम ज्या कंपनीला दिले होते, त्या कंपनीच्या तांत्रिक कामांमध्ये बिघाड झाला आहे. सर्व्हरची समस्या निर्माण झाल्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना नव्याने स्मार्ट कार्ड काढता येत नाही. मुदत संपलेल्या स्मार्ट कार्डचे नूतनीकरणही करता येत नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पुन्हा हाताने लिहीलेल्या पासेस देण्यास प्रारंभ करण्यात आला; मात्र हायटेक जमान्यात कागदी पास दिले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.





