पुणे जिल्हा | शालेय जीवनामध्ये अभ्यासामध्ये संघर्ष करा

भवानीनगर, (वार्ताहर)- विद्यार्थीदशेत जे काही वर्षे असतील त्या वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास केला, मेहनत घेतली, कष्ट घेतले तर त्यांच्या आयुष्यातील पुढील येणारे दिवस हे राजासारखे असतील. सध्याच्या काळामध्ये कोणतेही गोष्ट सहजासहजी मिळत नाही.
त्यासाठी संघर्ष करावा लागतो म्हणूनच विद्यार्थ्यांनी देखील शालेय जीवनामध्ये अभ्यासामध्ये संघर्ष करून आपले करिअर घडवावे, तरच पुढील आयुष्य राजासारखे आनंदी जगू शकतील. असे मत माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्याचा कार्यक्रम श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर संचलित श्री छत्रपती शिक्षण संस्था यांच्या वतीने घेण्यात आला होता. यावेळी आमदार भरणे बोलत होते.
ते म्हणाले की, शाळकरी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या आई, वडील आणि कुटुंबातील सदस्यांचा त्याग लक्षात ठेवावा. आपले आई-वडील आपल्यासाठी दिवस-रात्र राबत असतात. याची जाणीव ठेवल्यास आपणाला निश्चित यशापर्यंत पोहोचता येईल व आकाशाला गवसणी घालता येईल. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये.
यावेळी भरणे यांनी छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ राबवत असलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. सध्याच्या अकॅडमीच्या युगात भवानीनगर येथील श्री छत्रपती शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे म्हणाले, माजी राज्यमंत्री भरणे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक बाळासाहेब पाटील, राजेंद्र गावडे, गोपीचंद शिंदे, कुंदन पाटील, सचिन सपकळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, छत्रपती शिक्षण संस्थेचे प्राचार्य रमेश मचाले, मुख्याध्यापक सुनील सर्जे, लक्ष्मण गिरीगोसावी, भालचंद्र निंबाळकर, श्री खांडेकर, अभयसिंह निंबाळकर, विक्रमसिंह निंबाळकर, यशवंत पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव, वसंत जगताप हेमंत निंबाळकर, उपस्थित होते. यावेळी हर्षदा शेरकर, वेदांतिका खराडे, शिवतेज यादव या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.





