Pimpri : रावेत बंधाऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे : मोरेश्वर भोंडवे

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका शहरासाठी पाणी उचलत असलेल्या पवना नदीवरील रावेत बंधारा जुना झाला असून गाळाने पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे पवना धरणातून शहरासाठी सोडलेल्या पाण्यापैकी रोज सुमारे पाच कोटी लिटर पाणी वाया जाते. हा बंधारा बांधून अनेक वर्षे झाले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नुकतेच मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील साकव पूल कोसळल्याने चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने राज्यातील जुने आणि मुदत बाह्य झालेल्या सर्वच ठिकाणच्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
यामध्ये रावेत येथील जुना आणि जिर्ण झालेल्या रावेत बंधाऱ्याचा समावेश करून या बंधाऱ्याचे सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश द्यावेत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काही वर्षापूर्वी महापालिकेला दिलेल्या आदेशानुसार पावसाळ्याचे चार महिने रावेत येथील बंधाऱ्यापासून तर उर्वरित आठ महिन्यांत जलवाहिनीतून पाणी घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे रावेतला नवीन बंधारा बांधावाच लागणार आहे.
पाच कोटी लिटर पाणी वाया
रावेतचा बंधारा दुरुस्त होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तो तीन ते साडेतीन मीटर उंचीचा असून तेथे शहराचे सात-आठ दिवसाचे पाणी शिल्लक राहू शकते. मात्र बंधाऱ्यामुळे नदीपात्र गाळाने भरले आहे. तेथे जेमतेम एक दिवसाचे पाणी शिल्लक राहते. त्यामुळे धरणातून रोज पाणी बाराशे क्युसेक (घनफूट प्रतिसेकंद) सोडावे लागते. याचा अर्थ दररोज ५०० ते ५५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी धरणातून सोडले जाते, तर महापालिका दररोज ४५० ते ४८० एमएलडी पाणी घेते. त्यामुळे दररोज सरासरी पाच कोटी लिटर पाणी वहनव्ययाद्वारे वाया जाते.
तर गाळ साठण्याचे प्रमाण कमी होईल
शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून रावेत येथील जुना आणि जीर्ण झालेला रावेत बंधाऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तेथे ओबर मेयर गेटस बंधारा बांधल्यास गाळ साठण्याचे प्रमाण कमी होईल. पावसाळ्यात त्याचे दरवाजे खाली आडवे पडतात. त्यामुळे पुराची पातळी वाढत नाही. दरवाजामागे असलेले रबरी फुगे हवेने फुगविले जातात. दरवाजे उभे राहिल्यावर पाणी अडविले जाते. त्यामुळे पावसाळ्यानंतर तेथे साठा करता येतो. सध्याचा बंधारा दुरुस्ती पलीकडे आहे. त्यामुळे महापालिकेने नवीन आणि थोडा जास्त उंचीचा म्हणजे साडेचार मीटर उंचीचा बंधारा बांधल्यास त्यांचा पाणीसाठा वाढेल. तसेच नदीच्या सध्याच्या पात्राचा वापर करता येईल. या कामासाठी आणखी भूसंपादनाची आवश्यकता नाही.





