उन्हाची दाहकता वाढल्याने माठाला जोरदार मागणी

जालना : घनसावंगी तालुक्यातील कुंभार समाज बांधव आधुनिक साधन व तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक वस्तू कमी खर्चात तयार करत आहेत. दर्जेदार माठ, रांजण, घडगी १५० ते २०० रुपयांत विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात सर्वसामान्य जनतेला माठाचे थंड पाणी मिळत आहे. कडक उन्हात गरिबांच्या फ्रिजला मागणी वाढली आहे.
तालुक्यात कुंभार समाजातील बहुतांश कारागीर मातीपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करून उन्हाळ्यात बाजारात विक्री करतात. परंपरागत व्यवसायाला दर्जेदार बनवण्यासाठी कुंभार कारागीर विविध पद्धतीने मातीपासून वस्तू तयार करत आहेत. यासाठी वारूळ तसेच गढीची पांढरी माती खरेदी करून दर्जेदार रांजण, माठ, तसेच टाकी तयार करतात. मार्च महिन्यात उष्णता वाढल्याने आणि बाजारात फ्रिजचे वाढलेले भाव सर्वसामान्य जनतेला परवडत नसल्याने मातीच्या माठाला तसेच घडगीला मागणी वाढली आहे.
घनसावंगी तालुक्यात मागणीनुसार माठ, रांजण, घडगी, विविध मूर्ती तयार करून अंबड, जालना, शहागड, गेवराई येथे विक्रीसाठी नेले जातात. मातीवर विशिष्ट प्रक्रिया करून दररोज सुमारे १०० ते १२५ मातीची भांडी तयार केली जातात. भट्टीत भाजण्यासाठी ५०० च्या आसपास माठ तसेच रांजण एकत्र लावावे लागतात. दररोज एका बाजारात साधारणपणे २५० ते ३०० माठ १५० ते २०० रुपयांना विक्री होतात. वर्षभरात केवळ उन्हाळ्यातच मातीच्या वस्तूंना जास्त मागणी असते. मातीपासून माठ, रांजण, नांद यांसह भांडी देखील बनवली जातात. विविध प्रकारची मातीची सुबक खेळणी, लक्ष्मीदेवी, गणपती, दुर्गादेवीच्या मूर्ती, पोळ्यासाठी वापरण्यात येणारी मातीची बैलजोडी, अन्य भांडी व इतर वस्तू तयार केल्या.
महागाईमुळे यंदा दरवाढ
वारूळ तसेच चिकण मातीपासून दर्जेदार भांडी तयार करण्याचे काम आम्ही मागील कित्येक वर्षांपासून करत आहोत. सरपण, माती तसेच कारागीर यावर जास्त खर्च होतो. महागाई वाढल्याने यावर्षी थोड्याफार प्रमाणात भाववाढ करावी लागली आहे. या व्यवसायासाठी शासनाच्या वतीने कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही, अशी माहिती कारागीर कुंभार गणेश गोरे यांनी दिली आहे.





