एल अँड टीच्या शेअरची जोरदार खरेदी; सलग दुसर्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात माफक वाढ

मुंबई : भारत अमेरिका व्यापार करार अखेर झाला नाही. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदार कालपासून शेअर बाजारात खरेदी करीत आहेत. अशा परिस्थितीत सलग दुसर्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात अल्प वाढ झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 143 अंकांनी वाढून 81,481 अंकावर बंद झाला. विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 33 अंकांनी म्हणजे 0.14 टक्क्यांनी वाढून 24,855 अंकावर बंद झाला. पायाभूत सुविधा क्षेत्रातील लार्सन अँड ट्युब्रोे कंपनीच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे मुख्य निर्देशांकांना आधार मिळाला.
जूनअखेर संपलेला तिमाहित या पायाभूत सुविधा क्षेत्रातील एल अँड टी कंपनीचा नफा 30 टक्क्यांनी वाढून 3,617 कोटी रुपये इतका झाला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरची जोरदार खरेदी होऊन या शेअरचा भाव 5% पर्यंत वाढला होता. सन फार्मा, एनटीपीसी, मारुती, एअरटेल, ट्रेन्ट, अॅॅक्सिस बँक या कंपन्यांनी तेजीचे नेतृत्व केले. टाटा मोटर्स, पावर ग्रीड, इटर्नल, बजाज फिन्सर्व, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांनी मात्र विक्रीचा मारा सहन केला.
भारत- अमेरिका व्यापार करार होण्यात काही अडथळे निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर महिनाअखेर असल्यामुळे आयात करणार्याकडून डॉलरची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी 4,636 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मात्र देशातील संस्थागत गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदार खरेदी करून निर्देशांक वाढण्यास मदत करीत आहेत. खनिज तेलाच्या किमती वाढून 72 डॉलर पेक्षा जास्त झाल्या आहेत. याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. अशा परिस्थितीत खरेदीवर परिणाम होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. रॅलीगेअर या कंपनीचे विश्लेषक अजित मिश्रा यांनी सांगितले की, अमेरीका- भारत व्यापार तणावामुळे गुंतवणूकदार कुंपणावर बसून आहेत.





