बच्चू कडूंवर ‘प्रहार’; पक्षातील आमदार हाती घेणार ‘धनुष्यबाण’?

Bachchu Kadu | प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नेते छत्रपती संभाजीराजे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह एकत्र येत परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीने स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. मात्र आता ‘प्रहार’चे आमदार राजकुमार पटेल हे बच्चू कडू यांची साथ सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मेळघाटचे आमदार असलेले राजकुमार पटेल यांनी प्रहार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेत ते प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. पटेल यांनी एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीचं पोस्टर सध्या व्हायरल होत आहे. त्यात बच्चू कडू आणि प्रहार पक्षाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना धक्का
राजकुमार पटेल यांच्या ग्राफिक्स बॅनरवरुन बच्चू कडू यांच्या ऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून राजकुमार पटेल यांना विधानसभेसाठी मोठा शब्द मिळाला असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना धक्का बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रहारचे दोन आमदार निवडून आले होते. बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला पाठिंबा देत महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते. त्यानंतर जून 2022 मध्ये बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली.
परंतु आता बच्चू कडू यांनी महायुतीची साथ सोडत परिवर्तन महाशक्ती नावानं आघाडी स्थापन केली आहे. लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी महायुतीच्या भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार दिला होता. या निवडणुकीत अखेर नवनीत राणा यांचा पराभव झाला.





