नगर | शहरात 10 मेपर्यंत कडक निर्बंध; आजपासून फक्त मेडीकल व दूध वितरणाला मुभा
दूध वितरण करण्यासाठी केवळ सकाळी सात ते अकरा परवानगी

नगर (प्रतिनिधी) – आजपासून नगर शहरात पूर्णत: लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून, आता केवळ मेडिकल व दूध वितरण सुरु राहील. मार्केटयार्ड, रस्त्यांवरील भाजीबाजार, किराणासह अन्य अत्यावश्यक सेवाही येत्या 10 मेपर्यंत पूर्णत: बंद राहतील, अशी माहिती महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.
नगर शहरात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दिवसेंदिवस रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. करोनाचा साखळी तोडण्यासाठी नगर महापालिकेच्यावतीने आजपासून सात दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
2 मे रोजीच्या मध्यरात्री बारा वाजेपासून ते 10 मेपर्यंत कडक लॉकडाऊन असेल. त्यामध्ये आरोग्य सुविधा सोडून फक्त दूध वितरण करता येईल. त्यासाठी देखील सकळी 7 ते 11 पर्यतच मुभा देण्यात आली आहे. किराणाविक्री व भाजीपाला विक्रीही पूर्णत: बंद राहणार आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही भागातून शेतकर्यांनी नगर शहरात आपला शेतमाल विक्रीसाठी आणू नये. आणल्यास महापालिकेतर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे.
कडक लॉकडाऊन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे तसेच कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी मार्केटयार्डची पाहणी केली.
नगरमध्ये आता पूर्णत: लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठल्याही सबबीवर नागरीकांना रस्त्यावर फिरता येणार नाही. व्यायामासाठी देखील नागरीकांनी आता घराबाहेर पडू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
विशाल ढुमे, पोलीस उपाधीक्षक, नगर.





