अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार

तळेगाव ढमढेरे (वार्ताहर) – करोना रुग्ण आढळला, अशा प्रकारच्या अफवा काहीजण समाजमाध्यमांत पसरवत आहेत. या अफवा पसरल्यानंतर शासकीय यंत्रणेवर ताण येऊन कामात अडथळा निर्माण होत आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा शिक्रापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेश माळी यांनी दिला आहे.
शिरूर तालुक्यामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या आतापर्यंत 9 झाली आहे. त्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बाकीचे रुग्ण ठणठणीत असल्याचे प्राथमिक आरोग्य अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितले. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्येक बातमीची शहानिशा करावी. अशा प्रकारच्या पसरणाऱ्या अफवांमुळे जनसामान्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात. तसेच भीतीचे वातावरण निर्माण होऊन शासकीय यंत्रणेवर ताण येतो.
आम्ही करत असलेल्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊन आम्हाला सर्व बाबींना तोंड द्यावे लागत आहे. बाहेरगावच्या व्यक्तींची चौकशी करूनच गावात घ्यावे, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गावांमध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आहेत. अशा प्रकारच्या अफवांचे मेसेज विविध गावांतील ग्रुपवर फिरत आहेत. या प्रकारच्या अफवा विनाकारण पसरवणाऱ्यावर कायदेशीर कडक कारवाई करणार असल्याचे उपनिरीक्षक माळी यांनी सांगितले.





