Street Food: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! उघड्यावर होतेय खाद्यपदार्थांची विक्री; कारवाईची मागणी
Street Food: पावसाळ्यातील आर्द्र हवामानात विषबाधेचे संकट; कान्हे आणि कामशेत परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन.

Street Food – पावसाळ्याच्या दिवसांत तालुक्यातील कान्हे, कामशेत, वडगाव तसेच ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी हे खाद्यपदार्थ कोणतेही संरक्षण न करता उघड्यावर ठेवून विक्री केली जातात. त्यावर धूळ, माशा आणि दूषित वातावरणाचा परिणाम होत असून, संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यातील आर्द्र हवामानामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत स्वच्छतेचे निकष पाळले गेले नाहीत, तर अन्नातून विषबाधा होऊन संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. मात्र अनेक ठिकाणी विक्रेत्यांकडून या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही हातगाडी व्यावसायिक तसेच ग्रामीण भागातील अनेक हॉटेल व्यावसायिकांकडून अस्वच्छ पाण्याचा वापर,
हातमोजे न वापरणे, अस्वच्छ भांड्यांमध्ये अन्नपदार्थ तयार करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणे आणि खाद्यपदार्थ झाकून न ठेवणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. परिणामी ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आणि औद्योगिक परिसरांच्या आसपास अशा खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने विद्यार्थी, कामगार आणि नागरिक हे नियमितपणे या पदार्थांचे सेवन करतात.
त्यामुळे आरोग्य विभागाने नियमित तपासणी करून स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खातरजमा करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यात उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर आणि अस्वच्छ हॉटेलांवर अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त विशेष मोहीम राबवावी. स्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्या विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची भावना
ग्रामीण भागातील अनेक हॉटेलांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक ठिकाणी हॉटेलमधील स्वयंपाकगृहात अस्वच्छता, दुर्गंधी आणि स्वच्छतेचा अभाव असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जात नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांना केराची टोपली दाखवत व्यवसाय सुरू असल्याने ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.




