Summer : उन्हाळ्यात फ्रिज वापरताना ‘या’ चुका टाळा; नाहीतर अन्नासह आरोग्यालाही होईल मोठा धोका
उन्हाळ्यात जशी एसी किंवा कूलरची काळजी घेतो, तशीच फ्रिजची देखील घ्या.

Lifestyle – भारताच्या बहुतांश भागांत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कडक ऊन, घाम आणि उकाड्यामुळे चिडचिड वाढतेच शिवाय या दिवसांत फ्रिजचा वापरही खूप वाढतो. मात्र फ्रिजमध्ये काय ठेवावे आणि काय ठेवू नये याबाबत अनेकदा चुका होतात.
यामुळे अन्नाची गुणवत्ता, चव आणि पौष्टिकता कमी होऊ शकते, तसेच फ्रिजलाही नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे आम्ही खाली उन्हाळ्यात फ्रिज वापरताना टाळाव्यात अशा महत्त्वाच्या चुका आणि काही गोष्टी दिल्या आहेत ज्या फ्रिजमध्ये ठेवू नयेत.
फ्रिज वापरताना होणाऱ्या सामान्य चुका :
1) फ्रिज पूर्ण भरून ठेवणे
उन्हाळ्यात फ्रिज ओव्हरलोड केल्यास थंड हवा व्यवस्थित फिरत नाही. त्यामुळे कंप्रेसरवर अतिरिक्त ताण येतो आणि गॅस फ्लो बिघडू शकतो.
2) दीर्घकाळ साठवलेली अन्नपदार्थ
मलाई किंवा इतर पदार्थ अनेक दिवस तसेच ठेवल्यास दुर्गंधी निर्माण होते. याचा परिणाम फ्रिजच्या कार्यक्षमतेवर आणि अन्नाच्या सुरक्षिततेवर होतो.
3) भाज्या पिशव्यांतच ठेवणे
बाजारातून आणलेल्या भाज्या प्लास्टिक पिशवीतच ठेवल्यास जागा जास्त व्यापली जाते आणि ओलावा साचतो. त्या आधी स्वच्छ धुवून कोरड्या डब्यात ठेवणे योग्य.
4) फ्रिजभोवती अडथळे ठेवणे
फ्रिजच्या मागे किंवा बाजूला वस्तू चिकटवून ठेवल्यास उष्णता बाहेर पडत नाही. ओव्हरहिटिंगमुळे धोका वाढू शकतो.
5) डिफ्रॉस्ट न करणे
फ्रीजरमध्ये बर्फ साचत राहिल्यास फ्रिजची कार्यक्षमता कमी होते आणि वीज वापर वाढतो.
6) स्वच्छता न ठेवणे
फ्रिज नियमित साफ न केल्यास बॅक्टेरिया वाढू शकतात. यामुळे फळे-भाज्यांची ताजेपणा कमी होतो आणि आरोग्याचा धोका वाढतो.
7) अतिथंड तापमान सेट करणे
जास्त कूलिंग ठेवल्याने बर्फ जास्त साचतो आणि ऊर्जा खर्च वाढतो.
8) फ्रिजला विश्रांती न देणे
उन्हाळ्यात फ्रिजवर जास्त ताण येतो. शक्य असल्यास अधूनमधून थोड्या वेळासाठी बंद ठेवणे फायदेशीर ठरते.
फ्रिजमध्ये ठेवू नयेत अशा गोष्टी :
1) कांदा आणि बटाटा
फ्रिजमध्ये ठेवल्यास ओलावा वाढून ते लवकर सडतात. शिवाय दुर्गंधीही पसरते.
2) ब्रेड
फ्रिजमध्ये ठेवल्याने ब्रेड लवकर कोरडी होते आणि चव बिघडते.
3) मळलेले पीठ
७–८ तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले पीठ पौष्टिकता आणि चव गमावू शकते.
हे नक्की लक्षात ठेवा :
उन्हाळ्यात जशी एसी किंवा कूलरची काळजी घेतो, तशीच फ्रिजची देखील घ्या. योग्य तापमान, स्वच्छता आणि योग्य साठवणूक या तीन गोष्टी पाळल्यास अन्न सुरक्षित राहील आणि फ्रिजचे आयुष्यही वाढेल.






