प्राप्तिकर पोर्टल 15 सप्टेबरपुर्वी सुरळीत करा; निर्मला सीतारामन यांची इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना सूचना

नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाचे नवे पोर्टल अडीच महिन्यांपासून चालू करण्यात आले आहे. मात्र यामध्ये अनेक अडचणी येत असल्याची तक्रार प्राप्तिकरदात्यांनी वेळोवेळी केली आहे. हे पार्टल व्यवस्थित सुरू व्हावे याकरिता अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हे पोर्टल विकसित करणाऱ्या इन्फोसिस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांच्याशी सोमवारी चर्चा केली. हे पोर्टल कसल्याही परिस्थितीत 15 सप्टेबरपुर्वी सुरळीत चालू करण्याच्या सुचना सितारामन यांनी दिल्या.
पार्टल अडीच महिन्यापूर्वी सुरू करूनही त्यात अजूनही का अडथळे येत आहेत, अशी विचारणा सीतारामन यांनी पारेख यांच्याकडे केली असल्याचे कळते. यावेळी पारेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे पोर्टल कधी व्यवस्थित सुरू होईल या संदर्भातील तपशील सीतारामन यांच्याकडे सादर केला.
7 जून रोजी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. मात्र सुरुवातीपासून यात अडचणी येत आहेत. 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट रोजी हे पोर्टल बंद होते. त्यानंतर हे पोर्टल सुरू झाले असल्याचे इन्फोसिस कंपनीने म्हटले आहे.
या अगोदर याच कारणासाठी 22 जून रोजी सीतारामन यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली होती. प्राप्तिकर करदात्यांच्या अडचणी कमी व्हाव्यात आणि त्यांना विवरण वेगात भरता यावे याकरिता नवीन पोर्टल सुरू करण्यात आले होते. मात्र त्यामध्ये असंख्य अडचणी येत असल्यामुळे करदाते हैराण आहेत.





