Stray Dogs: “महापालिका प्रशासन जागे कधी होणार?” भटक्या कुत्र्यांच्या दहशतीवर विश्वजीत बारणेंचा सवाल
Stray Dogs: पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ५ वर्षांत केवळ ४३ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह.

Stray Dogs – पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या एक लाखाच्या पुढे गेल्याचा दावा केला जात असताना, मागील पाच वर्षांत केवळ ४३ हजार ६४४ कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, भटक्या कुत्र्यांच्या संख्येबाबत महापालिका प्रशासनाकडे अचूक आणि अद्ययावत माहिती उपलब्ध नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आक्षेप महापालिकेतील शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांनी केला आहे. बारणे यांनी म्हटले आहे की, चिखलीतील म्हेत्रे वस्ती परिसरात चार वर्षीय मुलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली.
या घटनेनंतर लहान मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील चार महिन्यांत शहरात तब्बल १३ हजार ६१५ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ३० ते ३५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात एक लाखांहून अधिक मोकाट कुत्री असल्यास परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना येते. शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांनी या परिस्थितीवर महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे.
न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे आवश्यक असताना महापालिकेने शहरात केवळ एकच नसबंदी केंद्र उभारले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे शक्य होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विविध विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक आर्थिक तरतूद आणि प्रभावी यंत्रणा उभारण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
९० टक्के कुत्री मोकाट
शहरातील केवळ दहा टक्के कुत्री पाळीव असून तब्बल ९० टक्के कुत्री मोकाट असल्याचा दावा करण्यात आला आहे. नागरिकांकडून तक्रारी करूनही अनेकदा कुत्री पकडली जात नाहीत. पकडलेली कुत्री दुसऱ्या परिसरात सोडली जात असल्याने समस्या कायम राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
उघड्यावर अन्न टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी
हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच नागरिकांकडून उघड्यावर शिल्लक व शिळे अन्न टाकले जाते. या अन्नामुळे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढतो. रात्रीच्या वेळी कुत्री अचानक वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या अंगावर धावून येत असल्याने अपघातांचाही धोका वाढला आहे. त्यामुळे कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि पकडण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्यासोबतच उघड्यावर अन्न टाकणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी विश्वजीत बारणे यांनी केली आहे. “महापालिका प्रशासन जागे कधी होणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.






