Stray Dogs: रावेतमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत! चिमुकल्यांचा जीव धोक्यात, पालकांमध्ये भीतीचे वातावरण
Stray Dogs: रावेतमध्ये भटक्या कुत्र्यांचा आक्रमक वावर वाढला; पादचारी आणि दुचाकीस्वारांवर हल्ल्याचा धोका, तातडीने कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी.

Stray Dogs – रावेत येथील सिटी प्राईड स्कूल परिसरात तसेच लगतच्या निवासी भागात भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे. याठिकाणी शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत परिसरात भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर धावून जाणे, पाठलाग करणे तसेच चावल्याच्या घटना घडल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.
त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. स्थानिक रहिवासी प्रवीण चव्हाण यांनी सांगितले, शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत मुख्य रस्ता, अंतर्गत गल्ल्या तसेच शाळेजवळील मोकळ्या जागांमध्ये भटक्या कुत्र्यांची टोळकी मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसतात. अनेक वेळा हे कुत्रे विद्यार्थी,
पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या अंगावर धावत असल्याने अपघाताचा तसेच जखमी होण्याचा धोका वाढला आहे. काही पालकांनी आपल्या मुलांना एकटे शाळेत पाठविणे बंद केले असून शाळेच्या वेळेत स्वतः सोबत जावे लागत असल्याचे सांगितले. परिसरातील अनेक सोसायट्यांमधील रहिवाशांनीही रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आणि आक्रमक वर्तनाचा त्रास वाढल्याचे सांगितले.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. एखादी गंभीर घटना घडण्याची वाट न पाहता महापालिकेने त्वरित कारवाई करावी, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने संबंधित परिसराची पाहणी करून आक्रमक भटक्या कुत्र्यांबाबत नियमानुसार कारवाई करावी, निर्बीजीकरण आणि रेबीजविरोधी लसीकरण मोहीम राबवावी. तसेच शाळांच्या परिसरात नियमित पथक नियुक्त करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.





