Stray Dog News – पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता गंभीर संकटात परिवर्तित झाला असून, आळेफाटा परिसरातही परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे. चाकण आणि आळंदी येथील अलीकडील घटनांनंतरही स्थानिक प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सकाळी शाळेत जाणारी मुले, कामगार आणि मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक सध्या सतत भीतीच्या छायेखाली वावरत असून भटक्या कुत्र्यांच्या कळपांमुळे रस्त्यावरून चालणेही धोक्याचे बनले आहे. आळेफाटा शहर हे वडगाव आणि आळे अशा दोन ग्रामपंचायतींच्या हद्दीत विभागले गेले असल्याने जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उघड्यावर टाकला जाणारा कचरा आणि मांसविक्रीचे अवशेष यामुळे कुत्र्यांना सहज खाद्य उपलब्ध होत असून त्यांच्या आक्रमकतेत मोठी वाढ झाली आहे. आळंदी, चाकण आणि राजगुरूनगर प्रमाणेच आळेफाट्यातही श्वानदंशाच्या घटनांचे प्रमाण वाढले असून दरमहा अनेक नागरिक या हल्ल्यांना बळी पडत आहेत. काही प्रकरणांमध्ये नागरिकांना गंभीर जखमा देखील झाल्या आहेत. निर्बीजीकरण मोहिमेबाबत अनास्था दरवर्षी श्वानदंशाच्या शेकडो घटना घडत असतानाही प्रशासनाकडून निर्बीजीकरण मोहीम प्रभावीपणे राबवली जात नाही. मानवी जीव धोक्यात असताना प्रशासन नेमके काय करत आहे, असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता प्रत्यक्ष जमिनीवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कुत्र्यांच्या आक्रमक वर्तनामुळे भीती परिसरातील कुत्र्यांचे टोळ्यांनी हल्ला करण्याचे तंत्र आणि त्यांच्या शरीरयष्टीतील बदल पाहता, काही ठिकाणी लांडग्यांसोबत संकरण झाल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. दरम्यान, श्वानदंशाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली असून, कुत्रा चावल्यास तात्काळ उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.