Strategy : ‘स्ट्रॅटेजी’ बिटकॉईन विकून उभारणार 1.25 अब्ज डॉलर्स
Strategy : कंपनीकडून मॉनेटायझेशन प्रोग्राम जाहीर : मोडणार आपलाच ‘सक्सेसमंत्रा’

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बिटकॉइनने जेव्हा १,२६,००० डॉलर्सचा उच्चांक गाठला होता, तेव्हा कंपनीने ६,००,००० हून अधिक टोकन्सचा साठा केला होता. मात्र, आता बिटकॉइनचे मूल्य निम्म्याने घसरून ६०,००० डॉलर्सच्या खाली आल्याने कंपनीचे एकूण मूल्य तिच्याकडील बिटकॉइन साठ्यापेक्षाही कमी झाले आहे. यामुळे नवीन सामान्य समभाग जारी करून भांडवल उभारण्याची कंपनीची क्षमता संपुष्टात आली आहे.
कंपनीसमोरील सर्वात मोठे संकट तिच्या ‘प्रिफर्ड शेअर्स’ धारकांना ११.५% ते १२% इतका प्रचंड वार्षिक लाभांश देणे हे आहे. हा १.८ अब्ज डॉलर्सचा लाभांश कंपनीच्या मुख्य सॉफ्टवेअर व्यवसायातील उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. हा लाभांश देण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवण्यासाठी कंपनीने नुकतेच ३२ बिटकॉइन विकले, ज्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सध्या कंपनीकडे ५१ अब्ज डॉलर्स मूल्याचे ८,४७,३६३ बिटकॉइन शिल्लक आहेत.
गुंतवणूकदारांची केली दिशाभूल…
या संकटातून मार्ग काढण्यासाठी ‘स्ट्रॅटेजी’ने प्रत्येकी १ अब्ज डॉलर्सचे प्रिफर्ड आणि क्लास ए कॉमन शेअर्स परत खरेदी (बायबॅक) करण्याची योजना आखली आहे. तसेच व्याज आणि लाभांश देण्यासाठी बिटकॉइनची विक्री सुरू केली आहे. टीकाकारांच्या मते, मायकल सेलर यांनी या उच्च परतावा देणाऱ्या शेअर्सची जाहिरात मनी मार्केटसारखी स्थिर म्हणून करून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली. सध्याच्या स्थितीत कंपनीने आणखी बिटकॉइन खरेदी करण्याऐवजी आपला रोख राखीव निधी मजबूत करावा, असा सल्ला विश्लेषक देत आहेत.





