UP पोलिसांचे अजब एन्काउंटर ! 7 आरोपींच्या पायावर एकाच ठिकाणी लागली गोळी

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद पोलिसांची गुरुवारी गौ-तस्करीतील आरोपींशी झालेली चकमक चर्चेचा विषय ठरली आहे. चर्चेचा विषय ठरण्यासाठी कारणही तसंच समोर आलं आहे. आरोपींकडून शस्त्रही हस्तगत कऱण्यात आले आहेत.
गुरुवारी लोनी बॉर्डर पोलिसांचा गौ-तस्करीतील आरोपींशी चकमक झाली. या चकमकीत 7 गौ-तस्कर जखमी झाले. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. तर या तस्करीतील दोन आरोपी फरार झाले आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून पाच बंदुका आणि धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आली.
पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली होती की, बेहटा हाजीपूरच्या भागातील एका गोदामात गोवंशाची कत्तल करण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापेमारी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पोलिसांवर गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी बचावासाठी 16 राऊंड गोळीबार केला. यात गोदामात वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसलेल्या सर्व आरोपींच्या पायाला गुडघ्याच्या खाली गोळ्या लागल्या.
जखमी झाल्यानंतर आरोपींनी गोळीबार थांबवला आणि शस्त्रे खाली ठेवली, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सर्वांच्या गुडघ्याच्या खालीच गोळी लागल्याने या इन्काउंटरची चर्चा रंगली आहे.





