Satara: दुचाकीवरून थेट जनतेत; शिवेंद्रसिंहराजेंचा ‘ग्राऊंड कनेक्ट’ चर्चेत
Satara मंत्रिपदाची जबाबदारी असतानाही ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी दुचाकीवरून शहरातील विविध भागांतील गणेश मंडळांना भेटी दिल्या. मंडपात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्थानिक पातळीवरील प्रश्न, अडचणी आणि परिसरातील घडामोडींचीही त्यांनी माहिती घेतली.

Satara: गणेशोत्सवाच्या निमित्ताने बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहरात दुचाकीवरून केलेल्या गणेश मंडळांच्या भेटीला राजकीय संदर्भ प्राप्त झाला आहे. कोणताही मोठा वाहनताफा किंवा नेहमीचा राजकीय लवाजमा न घेता त्यांनी शाहूपुरी, गडकरआळी परिसरातील मंडळांना भेटी देत कार्यकर्ते आणि नागरिकांशी थेट संवाद साधला. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा ‘ग्राऊंड कनेक्ट’ लक्षवेधी ठरला आहे.
मंत्रिपदाची जबाबदारी असतानाही ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी दुचाकीवरून शहरातील विविध भागांतील गणेश मंडळांना भेटी दिल्या. मंडपात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्थानिक पातळीवरील प्रश्न, अडचणी आणि परिसरातील घडामोडींचीही त्यांनी माहिती घेतली. त्यामुळे या भेटी केवळ धार्मिक दर्शनापुरत्या मर्यादित न राहता कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधण्याची संधी ठरल्याचे चित्र होते.
सातारा शहरातील राजकारणात आगामी काळात विविध पातळ्यांवर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असताना नेत्यांचा थेट जनसंपर्क महत्त्वाचा मानला जातो. या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजेंनी पदाचा औपचारिक आव न आणता कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याची पद्धत स्वीकारल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
विशेष म्हणजे, गणेशोत्सव हा राजकीय कार्यक्रम नसला तरी सार्वजनिक मंडळे ही स्थानिक पातळीवरील सामाजिक आणि राजकीय संपर्काची महत्त्वाची केंद्रे ठरतात. त्यामुळे विविध मंडळांना दिलेल्या भेटींमधून शिवेंद्रसिंहराजेंनी कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क अधिक दृढ करण्यावर भर दिल्याचे दिसून आले. दुचाकीवरून शहरातील गल्लीबोळांतून फिरत मंडळांपर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या शैलीची नागरिकांमध्येही चर्चा झाली. पद, सुरक्षा आणि लवाजमा यापेक्षा थेट लोकांमध्ये जाण्याला प्राधान्य देत असल्याचा संदेश त्यांच्या या दौर्यातून देण्यात आला.





